गाडीत गुदमरल्यामुळे एका वकिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सायनमध्ये गांधी मार्केट परिसरात एक कार बंद पडली होती. त्या गाडीत प्रियन नावाचा 30 वर्षीय वकील बेशुद्धावस्थेत आढळला. गाडीमध्ये गुदमरुन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास एका बंद गाडीत प्रियन बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला सायन रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचून प्रियनची गाडी लॉक झाली असावी. त्यामुळे त्याला बाहेर पडण्याची संधी न मिळाल्यामुळे श्वास गुदमरल्याची शक्यता आहे.
विक्रोळीमध्ये घर कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 45 वर्षीय महिला आणि दीड वर्षीय बालकाला जीव गमवावा लागला. तर भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. ठाण्यामध्ये तीन जण पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दहिसर परिसरात प्रतीक घाटले हा तरुण वाहून गेला. गौरेशला वाचवण्यात यश आलं, मात्र प्रतीक अद्यापही बेपत्ता आहे. कांदिवलीच्या समतानगरमध्ये महिंद्रा कंपनीजवळच्या नाल्यात ओमप्रकाश निर्मल हा 26 वर्षीय तरुण वाहून गेला आहे. त्याचाही शोध घेतला जात आहे.
मुंबईच्या बेभान पावसाने अगदी होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. मुंबईच्या पावसात अडकलेले काही जण अजूनही आपल्या घरी पोहोचलेले नाहीत.
‘एबीपी माझा’चं आवाहन :
मुंबईच्या पावसात तुमच्या कुटुंबियांपैकी किंवा तुमच्या मित्रमंडळींपैकी कोणी हरवलं असेल, तर त्यांचं छायाचित्र majhaphoto@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवा किंवा #माझाचीशोधमोहीम हॅशटॅग वापरुन आम्हाला @abpmajhatv ला टॅग करुन ट्विट करा.
तुमच्या आप्तजनांच्या शोधमोहिमेत, ‘एबीपी माझा’ही तुमच्यासोबत आहे.