Mumbai Rain मुंबई: मुंबईसह पश्चिम उपनगरात आज (18 ऑगस्ट) पहाटेपासून जोरदार पाऊस (Mumbai Rains) सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील 48 तासांसाठी मुंबई आणि ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट जारी (Mumbai Red Alert Rain News) करण्यात आला आहे. पावसामुळे मुंबईतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पावसामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतुकीसह आता विमानसेवेवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईतील मुसळधार पावसामुळे मुंबईत येणारी विमानं देखील हवेतच अडकली. मुंबई विमानतळावर लँड करणारे तब्बल 9 विमानांना गो अराउंड, गो अराउंडचा सिग्नल देण्यात आला. त्यामुळे 9 विमानं आकाशात चकरा मारत बसली होती. तर अहमदाबादकडून मुंबईकडे येणारं इंडिगोचं 6E6468 विमान मुसळधार पावसामुळे मुंबईऐवजी सूरतकडे वळवण्यात आले.
मुंबईतील लोकलसेवेवरही परिणाम-
मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकी सोबतच रेल्वे ट्रॅकवरतीसुद्धा पाणी साचायला सुरुवात झालीय. दादर स्थानकातील रेल्वे ट्रॅकवर ही मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलय. 15 ते 20 मिनिटे लोकल उशीराने धावत आहेत. पाऊस जर असाच सुरू राहिला तर रेल्वेही विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. तर मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि टिळक नगर येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल उशिराने धावत आहे. पावसाचा जोर वाढल्यास लोकल सेवेवर अधिक फरक पडू शकतो. सध्या हार्बर मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु आहे.
मुंबईत रस्त्यांवर वाहनांच्या रांगा-
मुंबईतील पावसाचा आता रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. एखाद्या कार पार्किंगमध्ये ज्या पद्धतीने गाड्या उभ्या असतात, तसे पश्चिम द्रुतगती महामार्गावर गाड्यांच्या रांगा दिसत आहे. पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये देखील पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. तर दादर, माटूंगा, चेंबूर, वडाळा परिसरातील रस्ते देखील पाण्याखाली गेल्याने वाहने अडकून पडली आहेत.
मुंबईतील शाळेला सुटी-
मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज दुपारच्या सत्रात सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. तर आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज, सोमवारी (18 ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे.