Mumbai Rain Updates : संपूर्ण राज्यभरात (Maharashtra Rain Updates) पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थितीही उद्भवली आहे. मुंबईसह (Mumbai Rains) उपनगरांतही पावसाचा जोर वाढला आहे. तसेच, शहरात सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू असताना दुसरीकडे मुंबईच्या समुद्रालाही उधाण आलं आहे. मुंबईच्या समुद्रात सध्या 4.47 मीटर्सपर्यंत उंच लाटा उसळताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांकडे न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे उधाण दुपारनंतर ओसरण्याचा अंदाज आहे. मात्र दरम्यानच्या काळात जोरदार पाऊस झाल्यास पाणी साचण्याची भीती आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पावसाच्या स्थितीचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं, असंही आवाहन प्रशासनानं केलं आहे.
मुंबईत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल त्यानंतर समुद्र किनाऱ्यावर कुणीही फिरकु नये, अशा सूचना महापालिका प्रशासनानं दिल्या आहेत.
यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं निर्णय घेतला आहे. मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवसांमध्येही वारंवार विनंती, आवाहनं करुनही मुंबईकर आणि इतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास जातात. तसेच, समुद्रात पोहण्यासही जातात. त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना कोणीही समुद्रकिनारी, बीचेसवर फिरण्यास किंवा पोहण्यास जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबईसह उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईत मुसधळार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच, अनेक सखल भागांत पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. पाणी साचत असलेल्या भागात वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा अद्याप मुंबई लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. लोकल सेवा सुरळीत सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Flood Situation : पूर आणि अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रात आत्तापर्यंत 76 जणांचा मृत्यू, तर शेती पिकांचंही मोठं नुकसान