Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी, 13 जुलै रोजी आयोजित करण्यात बैठक (MNS meeting Postpone) पुढे ढकलण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याबाबत पदाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Hevay Rains In Maharashtra) ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर राज हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत होते. या दरम्यान, राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे दिसून आले. या सगळ्या घडामोडींवर मनसेची भूमिका काय असणार, राज्यात मनसे कोणते नवीन आंदोलन सुरू करणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मनसेने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट करणारी आणि नागरिकांना आवाहन करणाऱ्या पत्रकांचे वाटप घरोघरी करण्यात आले होते. या आंदोलनाबाबतही चर्चा होणार असल्याची शक्यता होती.
राज यांचे आवाहन
मात्र, मुसळधार पावसामुळे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पुढे ढकलण्यात आली. राज ठाकरे यांनी म्हटले की, 13 जुलै रोजी एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मला तुमच्याशी संवाद साधायचा होता आणि काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या स्थितीत नवीन कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे अशक्य असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
अतिवृष्टीत लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले. नदीकाठाला असलेल्या लोकांसाठी जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करावा असेही राज यांनी म्हटले. पूरस्थिती उद्भवल्यास वृद्ध, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी यंत्रणांवर कोणताही ताण येईल असे कोणतेही काम करू नका, असे आवाहनही राज यांनी केले आहे.