मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमधून पावसाने विश्रांती घेतली होती. अशातच आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सगळीकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे हवेत थोडा गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला.


6 ते 9 सप्टेंबर या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राष्ट्रीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मुंबई, ठाण्यासोबतच नाशिक आणि जुन्नर परिसरातही मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड भागात रात्री मुसळधार पाऊस पडला. पुढील काही तासांत या भागांत ढगाच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे. कोकण किनारपट्टी काही भागात ही पावसाचा जोर राहील असा अंदाज आहे. पावसाचा जोर तळकोकणात वाढण्याची शक्यता असल्यानं समुद्रकिनाऱ्याजवळील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.


राज्यभरात पावसाची दमदार हजेरी


रविवार रात्रीपासूनच राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे पुण्यात सिंहगड रोडवरील किरकट वाडी येथील 20 दुकानांमध्ये गुडगाभर पाणी भरलेलं पाहायला मिळालं. तर साताऱ्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला आहे. यवतमाळमध्येही काल संध्याकाळी आलेल्या पावसामुळे नेर तालुक्यातील उमरठा गावाला फटका बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसलेल्या पावसमुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतातही पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. बुलढाण्यात काल संध्याकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याचंही पाहायला मिळालं.