ठाणे : आज पडलेल्या पहिल्याच मान्सून सरींमुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. दिवसभर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली मीरा-भाईंदर अशा शहरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत होता. आणि साहजिकच याचा परिणाम हा सर्वप्रथम मुंबईच्या लाईफ लाईनवर म्हणजेच मुंबई लोकलवर बघायला मिळाला. सतत पडलेल्या पावसामुळे ट्रकवरील पाणी धोक्याच्या पातळीच्या वर गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभर स्थगित ठेवण्यात आली होती. सोबत हार्बर मार्गावरील वाहतूक देखील स्थगित होती. मात्र, मुसळधार पाऊस पडूनही पश्चिम रेल्वेवरील वाहतूक स्थगित झाली नाही. 


सकाळी झालेल्या पावसामुळे, मध्य रेल्वेच्या कुर्ला, सायन, माटूंगा या तीन स्टेशन दरम्यान ट्रॅक वरील साचलेल्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे सकाळीच मध्य रेल्वेवरील जलद आणि धिमा मार्ग बंद करण्यात आला. यानंतर चुनाभट्टी स्थानकात पाणी साचल्याने हार्बर लाईन देखील बंद करण्यात आली. मध्य रेल्वेवर ठाणे ते सीएसएमटी स्थानकादरम्यान तब्बल नऊ तास सेवा बंद होती. केवळ ठाणे ते कर्जत आणि कसारा या स्थानकादरम्यान विशेष लोकल सोडण्यात येत होत्या. तसेच हार्बर लाइन वरील वाशी ते सीएसएमटी दरम्यान सकाळनंतर दिवसभर एकही लोकल धावली नाही. वडाळा स्थानकात पाणी साचल्याने सीएसएमटी ते गोरेगाव ही वाहतूक देखील बंद ठेवण्यात आली होती. अखेर संध्याकाळी आठच्या सुमारास मध्य रेल्वेच्या ट्रॅकवरील पाणी ओसरल्याने सुरुवातीस ठाणे ते सीएसएमटीही धीमी मार्गिका सुरू करण्यात आली. हार्बर मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत बंद होती.


Mumbai Rains Update : मुंबईत पावसाची विश्रांती तर पश्चिम उपनगरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात


मध्य रेल्वे जरी ठप्प झाली तरी पश्चिम रेल्वे मात्र प्रचंड पावसात देखील सुरु होती. मुसळधार पावसामुळे मर्यादित वेगात पश्चिम रेल्वेच्या लोकल धावत होत्या. तसेच ट्रान्स हार्बर मार्गदखील दिवसभर सुरू होता. पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर देखील परिणाम झाला. अनेक गाड्या या पूर्ननिर्धारित केलेल्या वेळेत सोडण्यात आल्या.


रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर
मध्य रेल्वेची धिमी मार्गिका सुरू, कल्याण ते सीएसएमटी दरम्यान धीम्या लाईन वर लोकल सेवा सुरु झाली आहे. सकाळी 9.50 ला सर्व मार्गिका बंद झाल्या होत्या. त्यानंतर आता पहिल्यांदा लोकल सुरू झाल्या आहेत. सोबत सीएसएमटी ते गोरेगाव ही हार्बर मार्गावरील वाहतूक देखील सुरू झालीय. आता केवळ सीएसएमटी ते वाशी ही वाहतूक बंद आहे.