मुंबई : मुंबईत (Mumbai Rain)गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (heavy rain) सुरु आहे. काल  भांडुपमध्ये मॅनहोल उघडे ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये पडताना दोन महिला थोडक्यात बचावल्या. याची अंगावर काटा उभारणारी दृश्य सर्वांनी पाहिली. अनेक दुर्घटना घडत असताना मुंबई महापालिका कधी धडा घेणार असा प्रश्न विचारण्यात येतो आहे. यावरुन सध्या राजकारण तापलं आहे.  


नेमकं घडलं काय


मुंबईमध्ये परवा मध्यरात्रीपासून पाऊस कोसळत आहे.  मुंबईतल्या रस्त्यांवर पाणी साचून नद्याचं रुप आलं होतं. याच रस्त्यांवरचं पाणी निचरा होण्यासाठी मॅनहोल उघडले गेले.  पण भांडुपमधलं एक मॅनहोल उघडलं गेलं. पण त्यावर निगराणी करण्यासाठी कुणीच नव्हतं.एक महिला याच मॅनहोलच्या दिशेने निघाली.आणि थेट मॅनहोलमध्ये कोसळली.ही घटना होऊन दोन मिनिटेही झाली नसतील त्याच मॅनहोलमध्ये दुसरी महिला कोसळली. सुदैवाने या दोन्ही महिला या मॅनहोलमधून बाहेर आल्या.  मॅनहोल उघडे असताना, त्यावर निगराणी का ठेवली जात नाही? असा सवाल आता केला जात आहे.  माणसाच्या जीवाला मुंबईत किंमतच नाही का? असा सवाल उपस्थित करणारी ही दृश्ये होती. 


Bhandup : भांडुप मॅनहोल संबंधी कारवाई करणार : महापौर किशोरी पेडणेकर


भाजप नेते काय म्हणाले...
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या 20 वर्षांहून जास्त कालावधी मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेनेचं राज्य आहे. दीड वर्षापासून राज्यातही त्यांचंच राज्य आहे. 40 हजार कोटींचं बजेट असतं. 58 हजार कोटींच्या एफडी आहेत. पण मुंबईकर पूर्णपणे असुरक्षित आहेत. किती जण या पावसाळ्यात मॅनहोलमध्ये पडतात. त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत लोकं धडा शिकवतील, असं पाटील म्हणाले. भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, काही हजार मॅनहोल्स मुंबईत आहेत. त्यात 40 टक्के मॅनहोल्सवर जाळ्या लावून आणि चांगली झाकणं लावून बंद केली आहेत. मॅनहोल्सवर जाळ्या लावण्याचं काम महापालिका करत नाही हे दुर्देव आहे. 80 हजार कोटीच्या ठेवींवर महापालिकेला 1600 कोटी व्याज मिळालं. तरी सुद्धा गलथान कारभार आहे. तुम्ही मुंबईकरांवर पैसे खर्च करायला तयार नाही. ही मोगलाई आहे. मॅनहोल बंद करता येत नाही. वॉर्ड ऑफीसरला तात्काळ निलंबित करा, अशी मागणी भातखळकर यांनी केली.


काय म्हणाल्या महापौर
यावर बोलताना महापौर किशोरी पेडणेकर  म्हणाल्या की, ही लोकांची ही जबाबदारी आहे.लोकं झाकण काढून नेतात आणि अशा दुर्घटना होतात. मात्र ही आमची जबाबदारी आहे आणि योग्य ती खबरदारी घेऊ. कोणाचा प्रश्न आहे हे महत्त्वाचे नाही. लोक सुद्धा पाणी जाण्यासाठी काही वेळा जाळी उघडतात. विरोधकांनी बजेट वगेरेबद्दल बोलण्याची गरज नाही. आमच्यासाठी हे महत्त्वाचं नाही. बजेट होतं म्हणून मुंबई वाचवली. आवाज करायला मिळाला म्हणून कसाही आवाज करायचा. जरा शांत घ्या, आम्ही पण त्याच मुंबईत राहतो. आम्ही पण करदाते आहोत. उगाचाच काहीही बोलू नका. कुठे वडाची साल पिंपळाला लावताय. तिथल्या वॉर्ड ऑफिसरला सांगू. तुमचा भरवसा नाही. काहीही कराल तुम्ही आणि व्हिडिओ पाठवाल, असा आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी भातखळकरांवर केला.


मुंबईच्या महापौर घटनास्थळी 


मुंबईच्या महापौर घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी या ठिकाणची पाहणी केली.या ठिकाणी लावण्यात आलेले फायबरचे निकृष्ट दर्जाची मॅनहोलची झाकणे पालिकेने बदलून आता या ठिकाणी लोखंड मजबूत झाकणे लावण्यास सुरुवात केली आहे. याची पाहणी केल्यानंतर महापौरांनी मुंबईच्या पदपथावरील अशी झाकणे बदलून लोखंडी झाकणे बसविणार असल्याचे सांगितले.सदरची झाकणे ही निकृष्ट दर्जाची नाहीत, लोखंडी झाकणे चोरी होऊ लागल्याने ही झाकणे पालिकेने लावली होती.पाणी आणि हवेच्या प्रेशरने झाकण खचले.ही धोकादायक आहे.या बाबत सर्वांना सूचना दिल्या आहेत.पदपथावरील झाकणे लोखंडी करण्याचे सांगितले आहे.सगळ्या मुंबईत ही झाकणे लावण्यास सांगितले आहे.येणाऱ्या पावसाळ्यानंतर जो आढावा घेणार आहे त्यात या वॉटर टेबलची शिफ्टिंग करता येईल का हे पाहणार आहोत.या मुळे अश्या दुर्घटना होणार नाहीत.विरोधकांना पावसाळा म्हणजे बेडूक जसे बाहेर येतात तशी संधी मिळते, मात्र लोक हुशार आहेत.अर्धी मुंबई पाण्यात होती हे बरोबर आहे, पण आपण 475 पंप लावले.4 तासाच्या आत पाण्याचा निचरा झाला.वाहतुकीचा खोळंबा नाही झाला.एरवीही ट्राफिक असते. मात्र पावसाची मदत घेऊन जर कोणी पोळ्या भाजत असेल तर ते त्यांना लखलाभ असो असे यावेळी महापौर म्हणाल्या.