मुंबई: मागील 4 दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागांमध्ये सध्या पावसाचा जोर चांगलाच वाढला असून दृश्यमानता देखील कमी झाली आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात मागील काही दिवसांची विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. मागील ४ दिवस पावसाने मुंबईत विश्रांती घेतली होती. मात्र आज पुन्हा एकदा सकाळ पावसाचा जोर वाढला आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर दिसत आहे. दृश्यमानता कमी झाली आहे आणि वाहनांचा वेग देखील मंदावला आहे. रेल्वे वाहतुकीवर देखील थोड्या फार प्रमाणात परिणाम जाणवत आहे. मध्य रेल्वे 5 ते 7 मिनिटे उशिराने हार्बर रेल्वे 5 मिनिटे उशिराने तर पश्चिम रेल्वे मार्गावर 5 मिनिटे उशिराने रेल्वे वाहतूक सुरू आहे. आज मुंबईत पावसाची धार कायम राहील. उद्या आणि परवा मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात
पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून अधून मधून जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात मागील दहा ते पंधरा मिनिटांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. जर असाच जोरदार पाऊस काही वेळ सुरू राहिला तर पश्चिम उपनगर जे सखल भाग आहे, त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात होणार आहे.तर पूर्व उपनगरात पावसाची उघडझाप सुरू आहे, आता सध्या पाऊस थांबला आहे. तर नवी मुंबई परिसरात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. ठाण्यात मध्यरात्रीपासून पडत असलेल्या पावसाने आज सकाळीपासून काहीशी विश्रांती घेतली आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात मागील काही दिवसांची विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
अधूनमधून अचानक जोरदार सरी कोसळण्याची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, या आठवड्याची सुरुवात सौम्य पावसाने होत असून मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या रिमझिम सरी पडणार आहेत. मुंबईत पावसाची तीव्रता गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी असेल, मात्र अधूनमधून अचानक जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमान 27 ते 31 अंश सेल्शिअस दरम्यान राहील आणि आर्द्रतेमुळे उकाड्याची भावना अधिक जाणवेल. वाऱ्याचा वेग सुमारे 25-30 किमी प्रतितास राहण्याचा अंदाज आहे. ठाणे आणि नवी मुंबईमध्येही संध्याकाळच्या वेळेस अचानक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
यलो अलर्ट जारी
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात, तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुलनेने कमी पाऊस पडेल, मात्र समुद्राला भरती येण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एकंदरित, आठवड्याभरात कोकणात काही भागांत मुसळधार तर काही भागांत सौम्य पावसाचं वातावरण राहणार आहे.
राज्यात पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी होणाऱ्या हालचालींमध्ये नागरिकांनी हवामान अपडेट तपासूनच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस पावसाचा जोर जास्त राहील, तर उर्वरित भागात ढगाळ वातावरण अनुभवायला मिळणार आहे.राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाला होता. केवळ अधूनमधून हलक्या सरी कोसळत होत्या. आठवड्याभरापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमध्ये आवश्यक तेवढं पाणी साठलं असून पाण्याची टंचाईची भीती दूर झाली आहे.