मुंबईत पावसाची उघडझाप सुरुच, लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2017 02:46 PM (IST)
पावसाने झोडपून काढलेल्या मुंबईत दुपारनंतर कडकडकीत उन पडलं. काल दिवसभराच्या दमदार पावसानंतर, रात्रभर पावसाने उसंत घेतली, मात्र आज सकाळी पुन्हा पाऊस सुरु झाल्याने मुंबईकरांची धाकधूक वाढली होती.
मुंबई: पावसाने झोडपून काढलेल्या मुंबईत दुपारनंतर उन पडल्याचं चित्र होतं. मात्र दुपारी तीन वाजता पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली पण त्यानंतर एक दमदास सर येऊन, पुन्हा पावसाने उघडीप दिली. काल दिवसभराच्या दमदार पावसानंतर, रात्रभर पावसाने उसंत घेतली, मात्र आज सकाळी पुन्हा पाऊस सुरु झाल्याने मुंबईकरांची धाकधूक वाढली होती. पण दुपारनंतर पाऊस कमी कमी होत आला आणि त्यानंतर चक्क उन पडल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मध्य रेल्वे पावसामुळे मध्य रेल्वेवर खोळंबलेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटीवरुन सकाळी 7.26 ला कल्याणकडे जाण्यासाठी पहिली लोकल सुटली. त्यानंतर मागोमाग दुसरी लोकलही निघाली, मात्र पुढे सायनजवळ ट्रॅकवर पाणी असल्याने, वाहतूक रखडली. मध्य रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक काही वेळातच रखडली होती. मात्र दुपारी 1.20 ला मध्य रेल्वेची अप आणि डाऊन फास्ट वाहतूक सुरु झाली. तसंच डाऊन स्लो वाहतूकही सुरु झाली. हार्बर रेल्वे हार्बर मार्गावर सकाळी 9.03 वाजता सीएसएमटीवरुन पनवेलच्या दिशेने पहिली लोकल सोडण्यात आली. मात्र ही वाहतूकही जास्तवेळ सुरु राहिली नाही. काही क्षणांतच वाहतूक रखडून ती ठप्प झाली. मात्र दुपारनंतर हार्बर मार्गावर कुर्ला ते पनवेल दरम्यान लोकल धावली. आता हार्बर मार्गावरची वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र लोकल उशीराने धावत आहेत. पश्चिम रेल्वे नेटाने सुरु मध्य आणि हार्बर रेल्वेने नांगी टाकली असली, तरी पश्चिम रेल्वे मात्र नेटाने सुरु आहे. सकाळच्या सत्रात लोकल धीम्या गतीने धावत होत्या. एल्फिन्स्टन स्थानकाजवळील पाण्याचा निचरा न झाल्याने त्यादरम्यान लोकल धीम्या गतीने धावल्या.