Mumbai Rain : मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी (Heavy Rain) लावली आहे. त्यात मुंबई हवामान विभागाकडून आज मुंबईला यलो अलर्ट (Mumbai Yellow alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळं पुढील काही तास मुंबईसाठी महत्वाचे आहेत. मुंबई परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईच्या समुद्रात आज साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीची मोठी भरती असल्यानं मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उंचच्या उंचच लाटा येऊन धडकत आहेत. याच कालावधीत पावसाचं प्रमाण अधिक राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यताही आहे.
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु
मुंबईमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे अरबी समुद्राला उधाण आले आहे. त्यातच आज साडेचार मीटर पेक्षा जास्त उंचीची मोठी भरती असल्याने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा येऊन धडकत आहेत. यामुळेच दादर चौपाटीवर असलेला विविंग डेक बंद ठेवण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय. तर दुसरीकडे समुद्राला भरती पाहायला मिळतेय. समुद्रकिनारी पाऊस आणि उसळणाऱ्या लाटांचा आनंद घेत मुंबईकर आणि पर्यटक पाहायला मिळत आहेत. दरम्यान, पावसामुळं लोकलसेवेसह इतर वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.
मुंबईत जोरदार पावसामुळं ठिकठिकाणी साचलं पाणी
मुंबईत जोरदार पावसामुळं ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अंधरे सबवेखाली चार ते पाच फूट पाणी साचलं आहे. त्यामुळं पूर्णत: वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, आज मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
पालघर जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरुच
पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची संततधार कायम असून आज पहाटेपासून पावसाने जिल्ह्यात जोर पकडला आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सातत्याने सुरू आहे. यामुळे नदी नाले ओसंडून व्हायला सुरुवात झाली आहे. तर शेतांमध्ये सुद्धा पाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर जिल्ह्यातील हळव्या भात रोपण्यांना वेग आला असून गरव्याभातरोपण या खोळंबण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. तर चांगला पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे धामणी कवडास ही धरण असू द्या किंवा वांद्री प्रकल्पाचे धरण असू द्या या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा निर्माण होत आहे. वसई विरार महानगरपालिकेसह मीरा भाईंदर महानगरपालिका आणि पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तर पालघर जिल्ह्याला आज आणि उद्या हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात पहाटेपासूनच जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून शेतामध्ये ही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. उमरेड तालुक्यातील पाचगाव परिसरात संत्र्याची बाग असो किंवा सोयाबीनचे शेत सर्वांना तळ्याचे स्वरूप आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या पावसामुळं झाल्याचा प्राथमिक चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या:
कोयनेसह महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला, धरणात प्रतिसेकंदाला 43 हजार क्युसेक्स पाण्याची आवक