कल्याण : बदलापूर परिसरात जोरदार पावसामुळे वांगणी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी स्थानकाजवळ अडकली आहे. जवळपास 700 प्रवासी यामध्ये अडकले आहेत. प्रवाशांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांपर्यंत मदतकार्य पोहचवण्यासाठी एअर फोर्सची दोन हेलिकॉप्टर्स पाहणी करण्यासाठी मुंबईतून रवाना होत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
कल्याण, बदलापूर अंबरनाथ परिसरात शुक्रवारपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. याठिकाणी पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. मुसळधार पावसामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी साचलं आहे.
वांगणी येथे पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. बदलापूर ते कर्जत, खोपोली दरम्यानची रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. तसेच अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या कल्याण, इगतपुरी, मनमाड, दौंड मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
डोंबिवली परिसरात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने वीज पुरवठा शुक्रवारी रात्री दहा वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे.