राष्ट्रवादीने ही जागा सोडली नाही तर हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून लढवणार की भाजपमधून या चर्चेला सुरुवात झाली आहे. नुकताच हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती. यामुळे वेगवेगळे तर्क लढविले जाऊ लागले आहेत.
2014 ला काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. आता 2019 च्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. आघाडीत इंदापूरची जागा कोण लढणार याचा संभ्रम कायम आहे. आघाडी नाही झाली तरी चालेल पण इंदापूरची जागा राष्ट्रावादीच लढेल, असा दावा अजित पवार यांनी केला होता तर इंदापूरची जागा मीच लढणार हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं होतं.
सख्खे शेजारी असलेले अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील राजकारणात पक्के विरोधक मानले जातात. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून ते दिसूनही आलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळीही हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांची नाराजी तात्पुरती का होईना दूर करण्यात आली होती.
आता पुन्हा विधानसभेच्या तोंडावर हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीमागं पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमंत्रणाचं कारण पाटलांनी पुढं केलं आहे.