मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, नवी मुंबई परिसरातही पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रस्ते वाहतुकीवरही यामुळे परिणाम झाला आहे.


गेल्या 24 तासात मुंबईत 50 ते 100 मिमी तर उपनगरांमध्ये 150 ते 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रुझमध्ये 192 मिमी तर कुलाब्यात 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


पहाटेपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे सायन, दादर, वडाळा, माटुंगा, अंधेरी, कुर्ला, कांदिवली, जेव्हीएलआर परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील वाहतूक मोठा परिणाम झाला होता. मुंबई शहर आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.


राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. आपल्या परिसरातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय राज्यातील मुख्याध्यापक घेऊ शकतात, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत.


बदलापूर जवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली

अंबरनाथ, बदलापूरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वांगणीदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प आहे. वांगणी येथे महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली असून 2 फूट पाणी ट्रॅकवर साचले आहे. एनडीआरएफला मध्य रेल्वेने पाचरण केले असून अनेक लोक गाडीत अडकले आहेत. आसपासच्या सामाजिक संस्थांना मदत करण्याचे मध्य रेल्वेने आवाहन केले आहे.