मुंबई : मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 20 जणांना आपले प्राम गमावाले लागले आहेत. याचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. राष्ट्रवादीने नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या सद्यपरिस्थितीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. मालाड दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही अजित पवारांनी केली.


मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. पावसाळ्याआधी सगळी कामे झाल्याचं नेहमी सत्ताधारी पक्षाकडून सांगितलं जातं, मात्र परिस्थिती जैसे थे असते. पहिल्या पावसात जनजीवन विस्कळीत होते. संपूर्ण महापालिकेची चौकशी करुन महापौर दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी अजित पवारांनी केली. गरज असेल तर महापालिकेवर प्रशासक नेमा किंवा मुंबई महानगरपालिकाच बरखास्त करा ,अशीही मागणी त्यांनी केली.


दरवर्षी बीएमसी मुंबई स्वच्छ झाल्याचा दावा करते. सरकारने खबरदारी न घेतल्याने माणसं किड्या-मुंग्यांप्रमाणे मरतात. जे आहे ते सांभाळता येत नसलेले स्मार्ट सिटी करायला निघालेत, असा टोलाही अजित पवारांनी सरकारला लगावला. महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही. हा सत्तेचा माज असून सरकारचा बेजबाबदारपणा आहे, असंही अजित पवार म्हणाले.


मालाड दुर्घटनेची चौकशी करा : भुजबळ


मालाड दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली. या दुर्घटनेला महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत का?  तसेच एसआरएचे अधिकारी जबाबदार आहेत का? याची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भुजबळ यांनी केली.


शिवसेनेनं 'भरुन दाखवलं' : जयंत पाटील

शिवसेनेनं मुंबईत करुन दाखवलं नाही तर भरून दाखवलं अशी उपरोधक टीका जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. त्यांनी सरकारला मुंबईतील पंपिंग स्टेशनबाबत प्रश्न विचारला. 2006 साली आमची सत्ता असताना राज्य सरकारने मुंबईसाठी दोन पंपिंग स्टेशन मंजूर केले. मात्र अजून महापालिकेने या पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण केलेले नाही.

मिठी नदीच्या खोलीकरणाच्या एमएमआरडीएने केलेल्या कामाच्या किंमतीत शून्य टक्के वाढ होती. मात्र महापालिकेच्या कामाच्या किंमतीत 70 टक्के वाढ दाखवण्यात आली. एमएमआरडीएने मिठीच्या खोलीकरणाचे 90 टक्के काम पूर्ण केले. तर महापालिकेने केवळ 62 टक्के काम पूर्ण केले. हे काम नीट केलं असतं तर मुंबईला एवढा फटका बसला नसता. मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.


मालाडमध्ये भिंत कोसळून 20 जणांचा मृत्यू


मुंबईतील मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून 20 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या याठिकाणी बचाव कार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर शताब्दी रुग्णालयात आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.


संबंधित बातम्या


Mumbai Rain | मुख्यमंत्री आपत्कालीन कक्षात, पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा

Mumbai traffic Update : मुंबईतील वाहतूक कोंडीचे अपडेट, पाहा कुठे कुठे भरलं पाणी

Mumbai Rain | मुंबईतील पावसाचा फटका टीव्ही इंडस्ट्रीला, अनेक मालिकांच्या शूटिंगला सुट्टी

Mumbai Rain : ‘मातोश्री’ जलमय, महापालिकेच्या कारभाराचे तीनतेरा

Chandivali Road Collapse | मुंबईत चांदिवलीच्या संघर्षनगरमध्ये रस्ता खचला