मुंबई : सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी कोसळणाऱ्या पावसाचा मोठा फटका रोज घराघरातं मनोरंजन करणाऱ्या टीव्ही इंडस्ट्रीलाही बसला. अनेक ठिकाणी दिलेल्या वेळेत कलाकार पोहोचू शकले नाहीत. तर बहुतांश ठिकाणी पावसाचं रौद्र रुप लक्षात घेऊन शूटना सुट्टी दिली आहे. त्यामुळे काही अंशी कलाकारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. असं असलं तरी जिथे सुट्टी नाही तिथे मात्र कॉल टाईमची वेळ पाळण्यासाठी कलाकारांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत सेट गाठावा लागला.

चित्रीकरणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरीला अर्थात फिल्मसिटीला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. फिल्मसिटीच्या काही सखलभागात पाणी साचलं आहे. अर्थात तिथून अद्याप शूट रद्द झाल्याची बातमी नाही. छत्रपती संभाजी, गुरूदेव दत्त आदी ठिकाणची शूट्स सुरू आहेत. तर बाळूमामाच्या सेटला मात्र सुट्टी देण्यात आली आहे.

अलिकडे ठाण्यात बरीच शूटस सुरु असतात. त्या अनेक शूटिंग्जना सुट्टी दिली आहे. यात ह.म.बने, तु.म.बने, घाडगे अँड सून यांचा समावेश होतो. शिवाय ठाण्यात माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेचं शूटही सुरु असतं. पावसाचं रौद्र रुप पाहता या शूटला सुट्टी देण्यात आली आहे. ह.म.बने.. मध्ये काम करणारी अभिनेत्री आदिती सारंगधर म्हणाली, दोन दिवसाच्या पावसाचा फटका आम्हा कलाकारांनाही बसला आहे. आमच्या मालिकेतील अभिनेता अजिंक्य जोशी याच्या घरात पाणी शिरल्यामुळे काल आणि आज असे दोन्ही दिवस शूटला सुट्टी दिली गेली. शिवाय, मुंबईच्या अनेक भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा, तुंबलेलं पाणी पाहता आम्हाला सुट्टी दिली आहे.'



झी युवावरच्या अनेक मालिकांना या पावसामुळे सुट्टी मिळाली आहे. यात आवर्जुन उल्लेख करायला हवा तो मीरा रोड इथे सुरु असलेल्या तू अशी जवळी रहा, घोडबंदर रोडवर असणारं फुलपाखरु, वर्तुळ, एक घर मंतरलेलं या सर्वच लोकेशन्सना याचा फटका बसला आहे. झी युवावर नव्याने सुफळ संपूर्ण ही मालिका सुरु होत आहे. त्या मालिकेचं सर्व शूट आऊटडोअर असतं. त्या मालिकेच्या चित्रीकरणाला याचा मोठा फटका बसला आहे. ही मालिका खरंतर 15 जुलैला प्रसारित होणार आहे. पण आता दोन दिवस पावसामुळे शूट रद्द झालं आहे. पावसामुळे या सेटवरचा ताण वाढला आहे. याबद्दल प्रातिनिधिक आवाहन करताना 'सारे तुझाचं'साठी फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे म्हणाली, 'मी आता सेटवर पोहोचले आहे. येताना अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. माझ्या समोरच्या बऱ्याच गाड्या यू टर्न मारुन परत जात होत्या. पण माझा कॉल टाईम होता आणि मी पोहोचणं आवश्यक होतं. आता सेटवर फार पाणी नाही. पण जे आहे ते काढणं सुरु आहे. आमचे सर्व कलाकार सुखरूप आले आहेत. पण एबीपी माझाच्या प्रेक्षकांना मी आवाहन करते, की गरज असेल तरच बाहेर पडा.'

मालिकांचं शूट करणं गरजेचंच

अनेक ठिकाणी मालिकांना गेल्या दोन दिवसांपासून शूटला सुट्टी आहे. शिवाय मुंबई आणि उपनगरांत पुढच्या चार दिवसांत जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. असं असलं तरी आणखी चार दिवस शूटला सुट्टी देणं शक्य नाही. कारण, जवळपास सर्वच मालिका आपल्याकडे पाच एपिसोड आगाऊ तयार करुन ठेवत असतात. त्यामुळे पुढच्या आठवड्यासाठी त्यांना शूट करावं लागणार आहे. मग आऊटडोअर असेल तर त्याचा ट्रॅक बदलून तो इनडोअर करण्याचा एक पर्याय त्यांच्यासमोर उरतो. तर काही ठिकाणी पावसाचेच ट्रॅक आणण्याच्या पर्यायावर विचार सुरु आहे.