मुंबईत दादर स्टेशनजवळ रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 17 Jun 2017 04:26 PM (IST)
मुंबई : मुंबईतील गजबजलेल्या दादर स्टेशनजवळ रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. अप्पासाहेब पाटील यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 57 वर्षीय रेल्वे पोलिस कर्मचारी अप्पासाहेब पाटील यांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याचं वृत्त शुक्रवारी समोर आलं. मात्र ही आत्महत्या आहे की अपघात, याबाबत काही काळ संभ्रमाचं वातावरण होतं. अखेर पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार ही आत्महत्या असल्याचं स्पष्ट झालं. पाटील हे कुर्ला रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते, तर दादर रेल्वे पोलिस कॉलनी मध्ये राहत होते. शुक्रवारी रात्री 8.45 वाजताच्या सुमारास दादरच्या मध्य रेल्वे मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर त्यांनी रेल्वेखाली उडी मारली. अप्पासाहेब पाटील यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.