नवी मुंबई : कोरोना काळात चोवीस तास ॲानड्यूटी असल्याने आपला परिवाराला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून नवी मुंबई मनपातील डॉ. वैभव झुंजारे यांनी परिवाराला गावाकडे ठेवले होते. पण काल परत घेऊन येताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात त्यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. कोरोनातून वाचलेलं कुटुंब अपघातात मात्र दगावलं.


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर खंडाळा घाटातील फुडमॉलजवळ भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक दिली. हा अपघात काल (मंगळवारी) मध्यरात्री एकच्या सुमारास झाला. या अपघातात  नवी मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ वैभव झुंझारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.


डॉ. वैभव झुंजार, नवी मुंबई महानगर पालिकेतील पशुवैद्यकीय अधिकारी. गेल्या 14 वर्षांपासून पालिकेत झुंजार यांनी अनेक पदावर काम केलं. कोरोना काळात चोवीस तास आरोग्य सेवेत स्वत: ला झोकून देत शहराला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी आहोरात्र काम केले. मात्र कोरोनाशी दोनहात करणारे डॉ. वैभव झुंजार यांची अपघाताशी लढतानाची झुंज कमी पडली. काल रात्री सोलापूरवरून येताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मध्यरात्री चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात अपघातात डॉ. वैभव झुंजार, पत्नी वैशाली झुंजार, आई उषा झुंजार आणि मुलगी श्रीया झुंजार यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा अर्णव झुंजार गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


कोरोना काळात डॉ. वैभव झुंजार चोवीस तास ॲानड्यूटी होते. त्यामुळे कोरोना आपल्या कुटुंबापर्यंत पोहचू नये यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला गावाकडे, सोलापुरातील माढा येथे ठेवले होते. सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर गेली 10 महिने गावाकडे असलेले कुटुंब आणण्यासाठी डॉ. वैभव झुंजार गावाकडे गेले होते. काल रात्री गावाकडून सहकुटुंब निघालेले झुंजार मात्र नवी मुंबईत पोचलेच नाहीत.


दरम्यान, डॉ. वैभव झुंजार यांनी कोरोना काळात 24 तास सेवा दिली. त्यामुळे त्यांच्या जाण्याने शहरवासीयांचे आणि मनपा प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे.