मुंबई : मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त प्रविण परदेशी यांनी अजॉय मेहता यांच्याकडून महापालिका आयुक्तपदाचा पदभार आज स्वीकारला आहे. तर अजॉय मेहता यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रविण परदेशी याआधी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होते.
प्रशासन-सत्ताधारी-मुंबईकर हा संवादाचा पूल अधिक मजबूत करणार असल्याचं प्रविण परदेशी यांनी म्हटलं आहे. पावसाळ्यातील आव्हानं समोर आहेत. मुंबईतील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष देणार तसेच नालेसफाईची कामं त्वरित मार्गी लावणार आहे. मुंबईकरांचा यंदाचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार, असल्याची पहिल्या प्रतिक्रिया प्रविण परदेशी यांनी दिली आहे.
कोस्टल रोडसंदर्भातील कोळी बांधवांची नाराजी दूर करणार
कोस्टल रोडसंदर्भातली कोळी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. अनेक देशांमध्ये ज्याठिकाणी मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे, त्या देशांतही कोस्टल रोडसारखे प्रोजेक्ट आहेत. कोस्टल रोड हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करू असा विश्वास परदेशी यांनी व्यक्त केला.
विकास आराखड्यावर लक्ष केंद्रीत करुन ज्या सूचना, हरकती प्राप्त झाल्या आहेत त्यांना विचारात घेऊन काम करणार असल्याचं परदेशी यांनी म्हटलं. घोटाळेबाजांवर कारवाई होईलच, पण यात निर्दोष भरडले जाणार नाही याचीही काळजी घेऊ. अधिकारी जनतेचं काम करण्यासाठी असतात, महापालिकेत गैरव्यव्हार होणार नाही, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. तसेच महापालिकेत सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात संवाद आहे तो अधिक मजबूत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्रविण परदेशींची कारकिर्द
प्रविण परदेशी 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. याआधी परदेशी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होते. याशिवाय वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास व महसूल अशा विविध विभागांत त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. 1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला त्यावेळी परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते. तेव्हा त्यांनी जो कामाचा धडाका दाखवला होता, त्याची मोठी प्रशंसाही झाली होती.
अजॉय मेहता यांची मुख्य सचिव पदी वर्णी लागल्याने प्रविण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्ती पदी नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतले आणि विश्वासातील अधिकारी म्हणून प्रविण परदेशींची ओळख आहे.
अजॉय मेहता यांनी स्वीकारला मुख्य सचिवपदाचा पदभार
अजॉय मेहता यांनी राज्याचे मावळते मुख्य सचिव यू पी एस मदान यांच्याकडून राज्याच्या मुख्य सचिव पदाची सूत्रे हाती घेतली. मेहता मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. सप्टेंबरमध्ये मेहतांचा कार्यकाळ संपणार आहे. मात्र विधानसभा निवडणुका लक्षात घेता मेहतांचा कार्यकाळ 3 ते 6 महिन्यांनी वाढवला जाण्याची शक्यता आहे.