ठाणे : ठाण्यात आंबे विक्रीवरुन मनसे आणि भाजपमधील वाद सुरुच आहे. महापालिकेनं मनसेला आंबे विक्रीसाठी परवानगी नाकारल्यानं मनसेनं स्वत:हून स्टॉल हटवला. त्यानंतर त्या जागेच्या 20 मीटर अंतरावरील परप्रांतीय आंबे विक्रेत्याच्या स्टॉलवर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आक्षेप घेतला आणि त्याला हुसकावूनही लावलं.


मराठी आंबेविक्रेते भाजपला चालत नाहीत. मात्र, परप्रांतीय विकत असलेले सडलेले आंबे चालतात. मराठी शेतकऱ्यांनी हप्ता देण्यास नकार दिल्यानं भाजपने महिलेला कारवाई करण्यास भाग पाडल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.


आंबे विक्री वादावरुन मनसेने मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप अविनाश जाधवांनी केला. त्यामुळे सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध म्हणून मनसे 17 मे रोजी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सहभागी होण्याची शक्यता आहे. या मोर्चामध्ये आंबा विक्रेते, समृद्धी महामार्गातील अन्याय झालेले शेतकरी सहभागी होणार आहेत.



काय आहे प्रकरण?


दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील नौपाडा परिसरात मनसे कार्यलयासमोर शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेले आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. हे आंबे अशाप्रकारे ठेवणं अनधिकृत आहे, असा आक्षेप भाजपा कार्यकर्त्यांनी घेतला. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी 'चौकीदार चोर है'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.


वादानंतर दुसऱ्या दिवशी मनसेने सर्व परवानग्या घेऊन पुन्हा एकदा स्टॉल उभा केल्याचा दावा केला आहे. सोबत शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नगरसेविकेवर पैसे मागितल्याचा आरोप स्टॉलधारकाने केला. यानंतर ताबडतोब भाजपच्या शहराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन या स्टॉलला कोणतीही परवानगी नसून पुन्हा पालिकेकडे कारवाईची मागणी करणार असल्याचं सांगितले. तसेच स्थानिक नगरसेविका मृणाल पेंडसे यांनीही स्वतःवरील आरोप फेटाळले.


आणखी वाचा