Mumbai Police Recuritment : मुंबईत पोलीस भरती (Mumbai Police Recuritment News) प्रक्रियेदरम्यान एका परीक्षार्थीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. चालक पदाच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत (Police Bharti) 17 फेब्रुवारी रोजी कलिना इथल्या कोळे कल्याण मैदानात उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येत होती. त्याचवेळी या भरतीसाठी आलेल्या 26 वर्षीय गणेश उत्तम उगले हा उमेदवार 1600 मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण होण्यापूर्वीच चक्कर येऊन जमिनीवर पडला. गणेशला तात्काळ व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
वाशिमचा गणेश उगले पोलीस भरतीसाठी मुंबईत
मूळचा वाशिमचा रहिवाशी असलेला गणेश पोलीस भरतीसाठी मुंबईला आला होता. पोलीस भरतीची परीक्षा सुरू असतानाच त्याला अचानक भोवळ आली आणि तो मैदानातच कोसळला. शुक्रवारी पोलीस भरती परीक्षेतंर्गत उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरु होती. त्यावेळी 1600 मीटर धावण्याची शर्यत घेतली जात होती. गणेशने आपली 1600 मीटर धावण्याची शर्यत पूर्ण केली आणि तेवढ्यात त्याला भोवळ आली. तो मैदानातच कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. गणेशती प्राणज्योत मालवली होती.
शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचं कारण स्पष्ट होईल
गणेशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून पोलीस याप्रकरणी सध्या अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी काय माहिती दिली?
"गणेश उगले आणि त्याच्या चुलत भावाने मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज केला होता. गुरुवारी हे दोघेही पोलीस भरती परीक्षेसाठी मुंबईत आले होते. रात्री तंबुत राहिल्यानंतर शुक्रवारी सकाळी उठून ते पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झाले. सकाळी पावणेअकराच्या सुमारास गणेश 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत सहभागी झाला होता. त्याने त्याची धावण्याची चाचणी पूर्ण केली. 1600 मीटरची अंतिम रेषा ओलांडताच तो मैदानातच कोसळला. पोलीस भरती परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने गणेश उगले याची तपासणी केली. त्यानंतर तात्काळ त्याला उपचारांसाठी सांताक्रूझ येथील व्ही.एन. देसाई रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, पोलीस बनायचं स्वप्न उराशी बाळगून गणेश मुंबईत दाखल झाला होता. भरती प्रक्रियेतील सर्व आव्हानं पार करुन पोलीस दलात सहभागी होण्याचं त्याचं स्वप्न होतं. पण गणेशचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं. गणेशच्या अशा अचानाक जाण्यानं त्याच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.