मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आज मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि वैभव पिचड तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.


शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यातील जावळी मतदारसंघातील आमदार आहेत. वैभव पिचड अहमदनगर येथील अकोले मतदारसंघातील आमदार आहेत. तर कालिदास कोळंबकर मुंबईतील वडाळा मतदारसंघातील आमदार आहेत. तिन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सांगितलं.

शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी)

शिवेंद्रराजे 2004 पासून सातारा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. शिवेंद्रराजे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्यानंतर ते बाहेर पडणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न खुद्द शरद पवारांनी केले होते. मात्र वाद मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी अखेर शिवेंद्रराजे यांनी आज राजीनामा दिला आहे. च्यासोबत बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बॅंकेचे संचालकही भाजपमध्ये जाणार आहेत.

वैभव पिचड (राष्ट्रवादी)

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक मधुकर पिचड यांचे पुत्र आणि अकोले मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. गेल्या पाच वर्षांपासून अकोले तालुक्याचा विकास रखडला असून रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक विकासाच्या योजना विरोधी पक्षात असल्यानं पूर्ण होत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला यश मिळालं आणि आगामी विधानसभेत हेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, अशी भावना कार्यकर्त्यांची झाली असून तालुक्याचा विकास व्हावा ही जनतेची भावना ओळखून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं आमदार वैभव पिचड यांनी सांगितलं होतं.



कालिदास कोळंबकर (काँग्रेस) 

कालिदास कोळंबकर यांनी कालच आपला राजीनामा प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्त केला आहे. 'मी काँग्रेसवर नाराज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलं म्हणून मला पक्षाने बाहेर केलं' असं म्हणत कालिदास कोळंबकरांनी मागेच भाजप प्रवेशाची घोषणा केली होती. कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर विधानसभेवर निवडून आले आहेत.



उदयनराजेंचं निवडणुकीनंतरचं वागणं बदललं, आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा आरोप