मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या पक्षप्रवेशावर शिवसेनेकडून अखेर पूर्णविराम मिळाला आहे. छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ शिवसेनेत येणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.


नाशिक आणि दिंडोरी येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या प्रवेशाबाबतचा मुद्दा उपस्थित झाला होता. भुजबळ कुटुंबियांकडून शिवसेनेशी कुठलाही संपर्क नाही असा उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासूनन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार अशा जोरदार चर्चा सुरु होत्या. मात्र आज या सर्व चर्चांना उद्धव ठाकरेंनीच पूर्णविराम दिला आहे.


छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनंतर शिवसैनिकांनी त्याला विरोध दर्शवला होता. विक्रोळी येथील शिवसैनिक रविंद्र तिवारी यांनी शिवसेना भवन समोर, मातोश्री समोर तसेच मुंबईच्या सर्वच प्रमुख चौकात भुजबळांच्या विरोधाचे बॅनर लावले होते. बॅनरवर छगन भुजबळ यांचे एक कार्टून असून त्यांना लखोबा लोखंडे संबोधलं होतं. साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरु शकत नाही, आपण आहे तिथेच राहा, असा संदेश या बॅनरवर देण्यात आला होता.



छगन भुजबळांकडूनही शिवसेना प्रवेशाचं खंडन


शिवसेना प्रवेशाबाबतच्या चर्चांचं छगन भुजबळांनी खंडन केलं होतं. मी शिवसेनेत प्रवेश करणार आहे, या बातम्या खोट्या आहेत. मी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. सचिन अहिर आणि माझा मुळचा मतदारसंघ भाखयळा जवळ असल्याने या चर्चा सुरु झाल्या असाव्या, असा अंदाज छगन भुजबळ यांनी व्यक्त केला होता.



संबंधित बातम्या