मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray Death Anniversary) शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) स्मृतिस्थळावर शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी पार्कवरील राड्याप्रकरणी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. ठाकरे गटाचे पदाधिकारी थोड्याच वेळात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाणार आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आल्यास गोंधळ होणार असा अंदाज होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले. मुख्यमंत्री अभिवादन करून बाहेर पडताच ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि अनिल परब बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल झाले. परब दाखल झाले आणि याच वेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला.
सूडबुद्धीने नोटीस पाठवल्याचा संजय राऊतांचा आरोप
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप शिंदे गटानं केला आहे. स्मृतीस्थळासमोर राडा सुरू होता तेव्हा सुरू असलेला राडा थांबवण्याऐवजी दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत होते. संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, सुरुवात कोणी केली त्यांच्यावरती नोटीस कारवाई का केली नाही ? मुंब्रा शाखेवरती ज्यांनी बुलडोजर चढवला त्याच्यावरती कारवाई का केली गेली नाही? शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर गद्दार आणि बेईमान लोकांनी पाय ठेवू नये. बाळासाहेब ठाकरे कायम गद्दारपणा तुडवा असे म्हणायचे. स्वतःला शिवसैनिक समजतात मग आमच्या लोकांनी तुडवण्याचा प्रयत्न केला असेल तर कशाला गुन्हे दाखल करत आहेत. नोटिसांना कोण विचारतो.. पाठवा नोटिसा 2024 पर्यंत तुम्हाला जेवढा कागदा वाया घालवायचा तेवढा घालवा.
शिंदे गटाचा आरोप काय?
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले.
ठाकरे गटाने काय म्हटले?
शिंदे गटाने केलेले आरोप ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत. कोणी सुरुवात केली, आक्षेपार्ह वर्तन केले हे कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल देसाई यांनी म्हटले. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत या स्थानाचे पावित्र्य भंग करायचे नाही, असेही त्यांनी म्हटले.
हे ही वाचा :