मुंबई: मुंबई पोलिसांच्या स्पेशल सेलनं झाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संदर्भातला अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यात झाकीर नाईकविरोधात गंभीर आरोप आहेत.
झाकीर नाईक आणि आयसिसचं कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे. गेल्या काही दिवसात झाकीर नाईकशी संबंधित काही लोकांना आसिसमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरुन अटक केली आहे. यात नवी मुंबईतल्या अर्शी कुरेशीचाही समावेश आहे.
राज्य सरकार हा रिपोर्ट केंद्राकडे देणार आणि कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कारवाई करणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या अहवालात झाकीर नाईकच्या संस्थेवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. झाकीर नाईककडून धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. तसंच झाकीर नाईकचे अर्शी कुरेशी आणि आयसिस कनेक्शन असल्याचंही अहवालात पोलिसांनी नमूद केलं आहे. दरम्यान या अहवालानंतर मुख्यमंत्री या अहवालानंतर काय निर्णय घेतात, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.