मुंबई: मुंबईतील खड्ड्यांचा त्रास सामान्य मुंबईकरांसोबतच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही सहन करावा लागत आहे. एका खटल्याच्या सुनावणीवेळी बोरीवलीपर्यंतचा प्रवास रस्त्याने केल्याने एका ज्येष्ठ न्यायमूर्तींना पाठदुखीचा त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे खड्ड्यांच्या समस्येवरून उच्च न्यायालयाने महापालिकेला चांगलेच फटकारले आहे.

 

एका खटल्याची सुनावणी सुरू असताना उच्च न्यायालायतील जेष्ठ न्यायाधीश विद्यासागर कानडे यांनी स्वत:चा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, ''काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईहून बोरीवलीपर्यंतचा प्रवास रस्त्याने केला आणि आठवडाभर पाठदुखीचा त्रास सहन करावा लागला. मान्सून काळात खड्डे, ट्राफिक यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील परिस्थिती फारच भीषण असते,'' असाही अनुभव त्यांनी बोलून दाखवला.

 

त्यामुळे मान्सून काळात मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने पालिकेला चांगलेच फैलावर घेतलं आहे. रस्त्यांची कंत्राट देताना कंत्राटदारांकडून रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असं लेखी हमीपत्र घ्या. नाहीतर आम्ही तसे आदेश देऊ, असे खडे बोल उच्च न्यायालयाने पालिकेला सुनावले आहेत.