मुंबई : सध्याच्या पिढीनं केवळ सिनेमात पाहिलेलं पोलीस दलातील अश्वदल आता खरोखर मुंबईत पाहता येणार आहे. तब्बला 88 वर्षांनी पुन्हा एकदा मुंबईच्या सरक्षेसाठी पोलिसांचं अश्वदल गस्त घालणार आहेत. वाहतूकीच्या नियमांचं उल्लघंन करणाऱ्यांसाठी याचा वापर होणार आहे. 26 जानेवारीच्यानिमित्ताने आज शिवाजी पार्क येथे हे अश्वदल सहभागी होणार आहे.


देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदा घोड्यावरस्वार असलेले मुंबई पोलीस आपल्याला पाहायला मिळणार आहे. देशात सध्या गुजरात, चेन्नई, हैदराबाद, केरळ, कर्नाटकातील पोलिस दलात घोड्यांचा वापर केला जातो. 26 जानेवारीच्यानिमित्ताने हे युनिट पुन्हा एकदा कार्यरत होणार आहे. या दलामध्ये 30 घोडे असणार आहेत. सध्या मुंबई पोलिसांनी 13 घोडे विकत घेतले असून अजून 17 घोडे विकत घेण्याचा प्रस्ताव आहे. 26 जानेवारी रोजी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या संचलनात 11 घोडे सहभागी होणार आहेत.

घोड्यावर बसल्याने उंचीवरुन जमावावर लक्ष ठेवता येते. त्यामुळे आंदोलन, जमाव नियंत्रित करण्यासाठी हे अश्वदल महत्वाचं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. घोड्यावरून येणारे पोलीस हे आंदोलनाच्या ठिकाणी लाठीचार्ज करणार नाहीत. मात्र घोडे आले की गर्दी आपोआप बाजूला होते, हे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

Mumbai Police | मुंबई पोलिस दलाचं अश्वदल लवकरच कार्यरत होणार | ABP Majha



या अश्वदलात एक पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, चार हेड कॉन्स्टेबल, 32 कॉन्स्टेबल असणार आहेत. या घोड्यावरील घोडेस्वारांना वाकिटॉकी देण्यात येणार असून समुद्र किनारी दोन घोडे ठेवण्याचा मुंबई पोलिसांचा मानस आहे. मरोळ येथे या घोड्यांना ठेवण्यासाठी पागा तयार करण्यात येणार आहे. सध्या त्यांची तात्पुरती व्यवस्था शिवाजी पार्क येथे करण्यात येणार आहे. मरोळ येथील पोलीस मैदानावर घोडेस्वारांचं प्रशिक्षण अन्य सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

आपत्कालीन स्थितीमध्ये तसेच एखाद्या कार्यक्रमामध्ये जमलेल्या गर्दीवर नजर ठेवणे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे अशा कामांसाठी अश्वदलाचा नक्कीच जास्त उपयोग होईल. याशिवाय मुंबई पोलिसांचं हे अश्वदल येत्या काळात मुंबईकरांचा आकर्षणही ठरु शकतं.