मुंबई : टॉप्स सिक्युरिटीचे माजी उपाध्यक्ष रमेश अय्यर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेकडून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रमेश अय्यर तीच व्यक्ती आहे, ज्यांच्या तक्रारीनंतर ईकडून टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहांग सरनाईक यांच्या पाठीशी ईडीचा ससेमिरा लागला.
टॉप्स सिक्युरिटीचे मालक राहुल नंदा यांच्याकडून टॉप्स सिक्युरिटीचे माझी उपाध्यक्ष रमेश अय्यर आणि पांघल यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. 14 सप्टेंबरला राहुल दिवानकडून खार पोलीस स्टेशन येथे दोघांविरुद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. ज्याचा सखोल तपास केल्यानंतर बुधवारी खार पोलिसांनी गुन्हा नोंदवत शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे तो गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
28 ऑक्टोबरला रमेश अय्यर यांनी राहुल नंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांमुळे कंपनीचे 175 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार केली होती. राहुल नंदा यांनी या आरोपांचं खंडन केलं होतं. मात्र, ईडीने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेत शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. तर सरनाईक यांचे कौटुंबीक आणि व्यसायिक मित्र अमित चांदोळेला अटक केली.
प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक ईडीच्या चौकशीला गैरहजर, दोघांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
रमेश अय्यर आणि पांघले यांच्यावर गैररित्या कंपनीचे पैसे वळवणे, अकाउंट्सशी छेडछाड आणि पदाचा गैरवापर सारखे आरोप लावण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदव्यात आला आहे. रमेश अय्यर यांच्यावर आरोप आहे, की त्याने प्रतिस्पर्धी कंपनीबरोबर मिळून टॉप सिक्युरिटीकडे असलेले ग्राहक त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपनीकडे वळवले. यामुळे कंपनीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येणार असून कंपनीच्या अकाउंटचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. ज्यानंतर कंपनीमध्ये काही गैरव्यवहार झाले आहेत का आणि ते कोणी आणि कसे केले हे स्पष्ट होईल. मात्र, या आधी देखील मुंबई पोलीस आणि सीबीआय समोरासमोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा मुंबई पोलीस आणि ईडी समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.