मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न व्हिडीओ तयार करुन अॅपवर पब्लिश केल्याच्या आरोपामुळे अटक केली आहे. अशातच राज कुंद्राची झळ शिल्पापर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून शिल्पाही पॉर्नोग्राफिक प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकली होती. अशातच शिल्पा शेट्टीनं पहिल्यांदाच या प्रकरणावर उघडपणी आपली बाजू मांडली आहे. शिल्पानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. शिल्पानं म्हटलंय की, ती सध्या या प्रकरणावर काहीही बोलणार नाहीये, कारण हे प्रकरण सध्या  न्यायप्रविष्ठ आहे.


बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मी आतापर्यंत याप्रकरणी कोणत्याही प्रकारे भाष्य केलेलं नाही. पुढेही करणार नाही कारण सध्या हे प्रकरण कोर्टात आहे." शिल्पानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलंय की, "हो, मागील काही दिवस माझ्यासाठी अस्वस्थ करणारे होते. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मला ट्रोल करण्यात आलं आहे. फक्त मलाच नाही, तर माझ्या कुटुंबियांनाही या प्रकरणात उगाच ओढण्यात आलं. मी अद्याप या प्रकरणी काहीही बोलले नाहीये, पुढेही बोलणार नाही. कारण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावतीनं चुकीची वक्तव्य लिहिणं थांबवा."



शिल्पानं पुढे लिहिलं आहे की, "माझा विचार हा आहे की, कोणाकडे तक्रार करू नका, कोणालाही समजावू नका."


अभिनेत्रीनं म्हटलं आहे की, तिला पूर्ण विश्वास आहे की, याप्रकरणी निष्पक्ष तपास केला जाईल. शिल्पा पुढे म्हणाली की, "मी केवळ एवढंच म्हणून शकते की, या प्रकरणाचा तपास सुरु आहे आणि मला मुंबई पोलीस आणि न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे."


शिल्पानं पुढे बोलताना आवाहन केलंय की, "एक आई म्हणून, मी माझ्या मुलांच्या प्रायव्हसीसाठी विनंती करते.आमच्याबाबत कोणतीही माहिती पडताळून पाहिल्याशिवाय छापू नका." पुढे बोलताना शिल्पा हेदेखील म्हणाली की, ती भारताची नागरिक आहे आणि देशातील सर्व कायद्यांचं ती पालन करते. ती 29 वर्षांपासून मेहनतीनं काम करते. तिचं म्हणणं आहे की, लोकांच्या त्यांच्यावर विश्वास आहे आणि कोणालाही निराश करणार नाही. 


सर्वात शेवटी शिल्पा शेट्टीनं लिहिलं आहे की, "मला आणि माझ्या कुटुंबाला प्रायव्हसीचा अधिकार आहे. मीडिया ट्रायल करु नका. कायद्याला आपलं काम करु द्या. सत्यमेव जयते!"


दरम्यान, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली होती. राज कुंद्रावर पॉर्न व्हिडीओ तयार करुन पब्लिश केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 27 जुलै रोजी राज कुंद्राला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


पुरुषांच्या चुकीसाठी महिलांना किती काळ दोषी ठरवायचे? राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या समर्थनार्थ रिचा चढ्ढा