मुंबई: मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल विशाल पवार याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. लोकल ट्रेनच्या (Local Train) दारात उभा असताना फटका गँगने (Fatka Gang) त्याच्या हातावर फटका मारुन त्याचा मोबाईल हिसकावला होता. यानंतर विशालने रेल्वे ट्रॅकवर उडी टाकत मोबाईल चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा फटका गँगने विशालला घेरुन त्याला विषारी इंजेक्शन दिल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली होती. परंतु, आता याप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. लोहमार्ग  पोलिसांनी याबाबत एक निवेदन जारी करुन विशाल पवार (Vishal Pawar) मृत्यू फटका गँगने दिलेल्या विषारी इंजेक्शनमुळे झाल्याची बाब नाकारली आहे. 


लोहमार्ग पोलिसांनी आपल्या निवेदनात काय म्हटले?


विशाल रमेश पवार यांच्याबाबत मोबाईल जबरी चोरीची व झटापटीची घटना घडल्याबाबतची माहिती मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयास दि.01.05.2024 रोजी संध्याकाळी प्राप्त झाली. सदर घटनेबाबत कोपरी पोलीस ठाणे, ठाणे शहर येथे गुन्हा रजि.क्र.399/2024, कलम 392, 394,328,34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा लोहमार्ग आयुक्तालयास वर्ग करण्यापूर्वी सदर गुन्ह्यातील फिर्यादी विशाल पवार हे मयत झाले होते. सदर गुन्ह्याची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर दादर रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र.522/2024, कलम 302, 392, 394,328,34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला.


सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे आयुक्तालयात वेगवेगळी पोलीस पथके नेमून तपास सुरु करण्यात आलेला असुन तपासात मृतक विशाल पवार यांनी कोपरी पोलीस ठाणे येथे दिलेल्या जबाबाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन, फलाट परिसर, रेल्वे ब्रिज, आस्थापना या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून त्याचा विविध तांत्रिक अंगाने तपास सुरु आहे.


फिर्यादीत नमूद वेळी व त्यानंतर सुमारे पाच ते सहा तास व त्यानंतरही मयत विशाल पवार हे सीसीटीव्ही फूटेज मध्ये इतरत्र ठिकाणी आढळले असून प्रथम दर्शनी फिर्यादीत नमूद वेळी व त्याच्या आसपास माटुंगा-सायन रेल्वे स्टेशन दरम्यान फटका मारुन मोबाईलची जबरी चोरी व त्यांच्यातील झटापटीची घटना घडली नसल्याचे दिसून येत आहे.


मृतकाचा मृत्यु नक्की कोणत्या कारणाने झाला या विषयी विविध तांत्रिक व शास्त्रीय अंगाने तपास सुरु आहे. तपास युध्द पातळीवर सुरु असुन तपासाबाबत संपूर्ण सत्य समोर येण्याच्यादृष्टीने माध्यमांनी थोडा संयम दाखवून सहकार्य करण्याची विनंती आहे.


आणखी वाचा


पाठलाग, मारहाण अन् विषप्रयोग; फटका गँगच्या मागे गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यूचा रक्तरंजित थरार