ACP Sujata Patil Suspended : मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त पदी राहिलेल्या सुजाता पाटील यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. सुजाता पाटील यांना काही दिवसापूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले होते. याप्रकरणी गुन्हा नोंदवून पाटील यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. सुजाता पाटील यांची न्यायालयाने जामीनावर सुटका केली होती. मात्र या कृत्याची गंभीर दखल घेत, शासनाने पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याशिवाय पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलीस स्टेशनचा चार्ज होता. काही दिवसांपूर्वी सुजाता पाटील यांनी एका प्रकरणासाठी एक लाखाची मागणी केल्याची तक्रार एका व्यक्तीनं केली होती. याचा पहिला हफ्ता 40 हजार रुपये घेताना सुजाता पाटील यांना रंगेहात एसीबीने सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
जोगेश्वरी येथे तक्रारदाराचा एक गाळा आहे. तो गाळा त्यांनी एका महिलेस भाडेतत्त्वावर दिला होता. पाच ऑक्टोबर रोजी तो गाळा त्यांनी भाडेकरुकडून ताब्यात घेतला होता. मात्र भाडेकरु महिलेसह इतरांनी गाळ्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. याबाबत त्यांनी जोगेश्वरी पोलिसांत भाडेकरुविरुद्ध तक्रार केली. पण पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी एसीपी सुजाता पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदत मागितली होती. गाळ्याचा ताबा घेतलेल्या महिलेकडून भविष्यात त्रास होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्याकडे एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यापैकी दहा हजार रुपये त्याच दिवशी घेतले होते. उर्वरित रक्कमेसाठी सुजाता पाटील त्यांच्याकडे तगादा लावत होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. त्यानंतर सापळा रचत सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, याआधीही सुजाता पाटील विविध कारणांमुळे चर्चेत आल्या होत्या. सुजाता पाटील यांनी हिंगोलीत बदली न झाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र लिहून आत्महत्या आणि राजीनामा हे दोनच पर्याय असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.