मुंबई : मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने एका अशा महिलेला अटक केली आहे, जीने चोरीची हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे. उच्चभ्रू वस्तीमध्ये लोकांच्या घरी भावनिक कारण सांगून काम मिळवायची आणि आठवड्याभरातच पैसे आणि सामान घेऊन लंपास व्हायची. या महिलेने फक्त मुंबईतच नव्हे तर भारताच्या विविध राज्यांमध्ये अशा प्रकारे लोकांची फसवणूक केली आहे.


मुंबई शहराच्या उच्चभ्रू वस्तीमधील लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या घरी मोलकरीण म्हणून ही महिला काम करायची. कधी सुनीता, वनिता, आशा, उषा, निशा अशी वेगवेगळी नावं सांगून घरात घुसायची. नंतर भावनिक कारण सांगून घरातल्यांचा विश्वास संपादन करायची आणि दहा दिवसात घरातील महागडे पैसे आणि वस्तू घेऊन लंपास व्हायची. फक्त मुंबईमध्येच या महिलेवर 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत तर देशाच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची फसवणूक या महिलेकडून करण्यात आली आहे.


ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा जुहूमधील एका कुटुंबाने या महिलेविषयी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणाचा समांतर तपास मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षानेही सुरू केला. प्रत्येक घरात चोरी केल्यानंतर ही महिला आपला राहण्याचं ठिकाण बदलत होती. तसेच इतर राज्यांमध्ये सुद्धा लोकांच्या घरी अशाच प्रकारच्या चोऱ्या करून ही महिला लंपास होत होती. त्यामुळे हिला शोधणं पोलिसांसाठी अवघड  होतं. या महिलेला शोधण्यासाठी मालमत्ता कक्षाने चेंबूर, वाशी नाका, मानखुर्द, शिवाजीनगर, देवनार अश्या विविध भागात पाळत ठेवली आणि अखेर त्यांना यश आलं.


2003 पासून ते 2020 म्हणजेच 17 वर्षात या महिलेने चोरीची हाफ सेंच्युरी पूर्ण केली होती. फक्त मुंबईतच नव्हे तर देशाच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा या महिलेवर गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे की एखाद्या व्यक्तीला कामावर ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती करून घ्यावी आणि मगच त्या व्यक्तीला कामावर ठेवावे. एखाद्या व्यक्तीला घरी कामावर ठेवण्याआधी त्यांची शहानिशा करने गरजेचं आहे. कारण काही वेळेला हे गुन्हे फक्त चोरी पुरतेच मर्यादित नसून अजून गंभीर स्वरूपाचे होण्याची शक्यता असते.


सदरची कामगिरी मिलिंद भारंबेसह पोलीस आयुक्त (गुन्हे), विरेश प्रभू, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव (प्रकटीकरण) यांच्या मार्गदर्शनाखाली, शशिकांत पवार प्रभारी पोलिस निरीक्षक मालमत्ता कक्ष यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम, अमित भोसले, पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब गादेकर, मनोज पाटील, पोलीस हवालदार सुनील कांगणे, पोलीस नाईक किरण जगताप, विश्वानाथ पोळ, संतोष औटे, महिला पोलीस शिपाई नयना पाटील तसेच सहाय्यक पोलीस फौजदार रमेश पासी या पथकाद्वारे ही कामगिरी बजावण्यात आली आहे.