मुंबई : ऐकावं ते नवलच, अशीच काहीशी घटना मुंबईच्या आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. आरे पोलिसांनी 'क्राईम पेट्रोल' आणि 'सावधान इंडिया'मध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनमुळे हातातलं काम गेलं. डोक्यावरचं छत सुद्धा जाण्याची वेळ आली, त्यावेळी या अभिनेत्री आरेमध्ये त्याच्या मित्राकडे गेल्या. हा मित्र पेईंग गेस्ट ठेवत असे, तिथे आधीच राहत असलेल्या पेईंग गेस्टचे पैसे यांनी चोरले.


टीव्हीवर लोकांनी गुन्हे कसे केले हे दाखवणाऱ्या दोन अभिनेत्री आज स्वतः एका गुन्ह्यात सहभागी झाल्या आहेत. आरेमधील रॉयल पाम अपार्टमेंटमध्ये 18 मे रोजी या दोन्ही अभिनेत्री आपल्या मित्राकडे जो पेंईग गेस्ट म्हणून लोकांना ठेवत होता त्याच्याकडे राहायला गेल्या. तिथे आधीच एक जण राहत होता. त्याच्या लॉकरमध्ये ठेवलेले 3 लाख 28 हजार रुपये घेऊन या दोघी पसार झाल्या. अटक करण्यात आलेल्या या दोन्ही अभिनेत्रींची नावे सुरभी श्रीवास्तव (वय 25 वर्ष) आणि मोसीना शेख (वय 19 वर्ष) अशी आहेत. लोकांचे गुण हे दाखवता दाखवता या दोघी कधी गुन्हेगार झाल्या ते कळलच नाही. त्यांची चोरी सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं या दोघींच्या लक्षात आलंच नाही.


आपले पैसे चोरी झाल्यानंतर तक्रारदाराने या दोन मुलींवर संशय व्यक्त करत आरे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दोन्ही अभिनेत्री आपल्या हातात एक बॅग घेऊन जाताना स्पष्ट दिसल्या. ज्यामुळे या दोघींकडे आताच लपवण्यासाठी काहीच राहिलं नव्हतं आणि आपला गुन्हा मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायही नव्हता. कसून चौकशी केल्यानंतर दोघींनी आपला गुन्हा मान्य केला.




आरे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूतन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर आधी कुठच्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का याचाही तपास पोलिसांकडून लावला जात आहे.


या दोघीही मुंबईमध्ये स्ट्रगलर म्हणून आल्या होत्या आणि बॉलिवूडमध्ये यांना मोठं नाव कमवायचा होतं. क्राईम पेट्रोल, सावधान इंडियासारख्या मालिकांमध्ये यांनी काम केले असून काही वेब सीरिजमध्ये सुद्धा यांनी काम केलं होतं, मात्र आता त्यांना तुरुंगवास झाला.


लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातातलं काम गेलं आहे. दोन वेळेच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र त्यासाठी गुन्हेगारी मार्ग वापरणे हे कधीच उत्तर नसेल.