मुंबई : पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलण्यास मनाई केल्यामुळे पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्याला सात तरुणांनी बेदम मारहाण केली आहे. मुंबईतील चेंबुर भागातून ही घटना समोर आली आहे. मारहाणीचा प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.


चेंबूर येथील एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी मंगळवारी रात्री कुर्ला कसाईवाडातील तरुण दुचाकी घेऊन आले होते. यातील एक तरुणाने पेट्रोल भरत असताना मोबाईल फोनवर बोलण्यास सुरुवात केली. यावेळी पंपावरील कर्मचारी विक्रांत सिंह यांनी त्या तरुणाला पेट्रोल पंपावर फोनवर बोलण्यास मनाई केली.

वारंवार जनजागृती करुनही अनेक जण पेट्रोल पंपांवर बिनधास्तपणे मोबाईलवर बोलताना आढळतात. पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलताना आग लागण्याची शक्यता असते.

फोनवर बोलण्यापासून रोखल्याच्या रागातून संबंधित तरुण आणि त्याच्या सात मित्रांनी या कर्मचाऱ्याला जबरदस्त मारहाण केली. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस बीटमधील पोलिस हवालदार घटनास्थळी आले, पंरतु त्यांच्यासमोर गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण सुरुच ठेवली.

अखेर पोलिस व्हॅन येताच त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. ही संपूर्ण मारहाण पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. आरोपींवर विविध कलमांखाली कारवाई केल्याची माहिती परिमंडळ 6 चे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली आहे.