मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या चार्जशीटमध्ये अनेक धक्कादायक नोंदी केल्या आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचाही मनसूख हिरेन हत्याकांडात सहभाग असल्याचा संशय बळावलाय. एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये अशा अनेक पुराव्यांचा संदर्भ दिला आहे ज्यामध्ये परमबीर सिंह यांनाही या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं जात आहे.
या प्रकरणी एनआयएने अधिक तपास केला असता ज्या अधिकाऱ्याचे नाव समोर आलं तो अधिकारी परमबीर सिंहाच्या जवळचा मानला जातो. त्या अधिकाऱ्याने दहा वर्षे परमबीर सिंहाच्या सोबत काम केलं आहे. एनआयएने या अधिकाऱ्याची चौकशी केली असता परमबीर सिंहांचे नाव समोर आलं आहे.
परमबीर सिंह हे फेसटाईम आयडीचा वापर करुन मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या संपर्कात होते. त्यांच्या फेसटाईम आयडीचा पहिला शब्द कुरकुरे आणि शेवटचा शब्द हा बालाजी असा होता.
परमबीर सिंह होम गार्ड विभागाचे महासंचालक होते तेव्हा त्यांनी या अधिकाऱ्याला एक सेकंड हॅन्ड अॅपलचा मोबाईल आणायला सांगितला होता. त्यावेळी सिताबे खान नावाच्या एका व्यक्तीकडून आपण असा मोबाईल घेतला असल्याचं त्या अधिकाऱ्याने सांगितलं. त्यानंतर आपणच त्याचे आयडी नाव कुरकुरे बालाजी असं ठेवल्याचंही त्याने सांगितलं.
सूत्रांच्या मते, परमबीर सिंह हे मनसूख हिरेन प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पण अजून काही सबळ पुरावे उपलब्ध नसल्याने त्यांचे नाव एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये आरोपी म्हणून दाखल केले नाही.
सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अॅंटिलिया कांड प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिन्द नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा सायबर एक्सपर्टनं केला आहे. यासाठी परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच दिली असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळच्या अधिकाऱ्याचा जबाब देखील घेण्यात आला. त्या अधिकाऱ्यानं देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन त्यानं 5 लाख रुपए सिक्रेट सर्व्हिस फंडातून काढून सायबर एक्सपर्टला दिले होते.
संबंधित बातम्या :
Antilia Case: वाझेच्या कथित मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा! वाझे मला एस्कॉर्ट सेवेतून काढून बिझिनेस वूमन बनवणार होते
सचिन वाझेला कोर्टाचा दिलासा! वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईतील खाजगी रूग्णालयात दाखल होण्याची परवानगी
अँटिलिया आणि मनसूख हिरेन प्रकरणात सचिन वाझेने वसुली केलेल्या पैशांचा वापर: NIA