मुंबई : मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. कारण गरज पडल्यास दिल्ली-मुंबई रेल्वे सेवा आणि विमानसेवा बंद करण्याचा पर्याय असल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. तर 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करा अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर जाऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय पालकमंत्री आणि महापौरांनी सांगितले.


गेल्या काही दिवसांपासून देशाची दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याशिवाय अहमदाबादमधील रुग्णसंख्याही वाढतीच आहे. या शहरांची परिस्थिती पाहता खबरदारी म्हणून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही मुंबई-दिल्ली रेल्वे आणि विमानसेवा रद्द करण्याचा पर्याय असल्याचं म्हटलं आहे.


गरज पडल्यास रेल्वे-विमानसेवा बंद करु : पालकमंत्री
अस्लम शेख म्हणाले की, ज्याप्रमाणे दिल्ली आणि गुजरातमधील रुग्ण वाढत आहेत ते पाहता तिथली व्यवस्था कोलमडल्याचं चित्र आहे. मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातील रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे रेल्वे, विमानसेवा बंद करायची किंवा त्या कशा चालवायच्या त्यासाठी नियमावली काय असेल यावर विचार सुरु आहे. उदाहरणार्थ दुबईला गेल्यास तिथे पोहोचल्यावर आधी आरटीपीआर केली जाते, मग हॉटेलमध्ये ठेवलं जातं. दुसऱ्या दिवशी चाचणी निगेटिव्ह आली तर शहरात फिरण्यासाठी परवागनी दिली जाते अन्यथा क्वॉरन्टाईन केलं जातं. तशी एसओपी आपण आणू शकतो. ट्रेनसाठी काय करु शकतो त्यावर विचार करतोय. ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाशांनी आधीच आरटीपीसीआर टेस्ट करुन मुंबईत यावं. त्यांना प्रवेश द्यायचा की क्वॉरन्टाईन करायचा याचा विचार सुरु आहे. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी टास्क फोर्स काम करत आहे. गरज पडली एसओपी आणू किंवा रेल्वे, विमानसेवा बंद करु."


15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करा : महापौर
तर दुसरीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याने त्यांनी ही मागणी केली आहे. कोविड रुग्णांचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावं, असं आवाहन महापौरांनी केलं आहे.


Aslam shaikh on Mumbai Lockdown | गरज पडली तर ट्रेन, विमानसेवा बंद करण्याचा पर्याय : अस्लम शेख