मुंबई : लहान मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'ट्री हाऊस' नर्सरीच्या 113 शाखा अचानक बंद झाल्या आहेत. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचं पहिलं वर्ष पूर्ण होण्याआधीच संपलं. शिक्षकांना 5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं ट्री हाऊसच्या सर्व शाखांना टाळं लागलं आहे.
सकाळी शाळेत मुलांना घेऊन आलेल्या पालकांना हा संपूर्ण प्रकार पाहून धक्का बसला. शिक्षकांनी मुलांना परत नेण्यास सांगितलं. व्यवस्थापनाकडे पगार देण्यास, शाळेच्या जागेचं भाडं देण्यास पैसेच नसल्याचं सांगण्यात आलं. पालकांनी थेट ट्री हाऊसचं मुख्य कार्यालयही गाठलं, पण तेही बंद होतं.
त्यातच पोलिसांनी तक्रार घेतली नसून फक्त अर्ज घेतल्याचं पालकांचं म्हणणं आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही हजारो रुपये फी भरली होती, अशी माहिती पालकांनी दिली. या पालकांची खरी अडचण म्हणजे ट्री हाऊसच्या सर्व 113 शाखेत शिकणाऱ्या मुलांना नर्सरी सोडल्याचा दाखलाही मिळणार नाही. त्यामुळे आता हे पालक सरकारकडे मदतीच्या आशेनं बघत आहेत.