मुंबई : मुंबईतील उंच इमारतींच्या गराड्यात असलेल्या काही चाळी आजही आपलं अस्तित्व जपून ठेवत आहेत. मात्र कुर्ल्यातील चाळींना झोपडपट्टी घोषित केल्याने त्या नष्ट होण्याच्या वाटेवर आहेत.
कुर्ला परिसरात आजही ब्रिटीशकालीन चाळी जिवंत आहेत. जवळ जवळ शंभर-दीडशे वर्षापूर्वीच्या या चाळीतून मराठी माणसाला हद्दपार करण्याचा घाट घातल्याचा आरोप होत आहे.
चाळीतील रहिवाशी पिढ्यान पिढ्या राहत आहेत. अचानक चाळच अनधिकृत ठरवल्यानं रहिवाशांच्या पाया खालची जमिनच सरकली.
स्वच्छ आणि लांब रस्ते, बंदिस्त गटारं, घराघरात पाणी... जुन्या मजबूत इमारती... शौचालयाची व्यवस्था असणाऱ्या या चाळींना झोपडपट्टी कशी ठरवली जाते, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कोणते निकष लावून या जागेला गलिच्छ अतिक्रमीत झोपडपट्टी घोषित केली आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
ज्या चाळींमध्ये तीन-चार पिढ्या गेल्या ती चाळ वाचवण्यासाठी रहिवाशांनी आंदोलन करुन उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.