मुंबई :  मुंबईत (Mumbai News) पावसाने दडी मारल्याने पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे.  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 19.5 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबई समोर पाणी कपातीचे संकट उभं राहण्याची शक्यता आहे.  मुंबई महापालिकेने राज्य सरकारला अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून अधिकचे पाणी मिळावे यासाठी पत्र लिहिले आहे. (Mumbai Water Shortage News)


मुंबईच्या आजूबाजूला जरी समुद्र असला तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणारे स्रोत तसे  ठरावीकच आहेत. मुंबईला सात धराणांमधून पाणी पुरवठा केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमध्ये केवळ 19.5 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.  याच महिन्यात 2022 मध्ये मे महिन्यात याच काळात 23 टक्के पाणीसाठा होता.  यासाठीच मुंबई महापालिकेने राज्य सरकारला अतिरिक्त पाणीसाठा मिळावा यासाठी पत्र लिहून मागणी केली असल्याची माहिती समोर आहे. अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातील शिल्लक पाणी हे मुंबईसाठी  द्यावे अशा प्रकारची मागणी राज्य सरकारकडे मुंबई महापालिकेने केली आहे. 


मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्यात पाण्याचा वापर होत असून वाढलेल्या उकाड्यामुळे मुंबईतील पाणीसाठा संपत असल्याचे चित्र आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना जपून पाणीसाठा वापरावा लागणार आहे. येत्या काही दिवसांत अपेक्षित पाऊस न पडल्यास मुंबईवर पाणी कपातीचे संकट अटळ आहे.


कोणत्या धरणात किती पाणीसाठा उपलब्ध?



  • अप्पर वैतरणा -12 टक्के

  • मोडक सागर - 29 टक्के

  • तानसा - 31 टक्के

  • मध्य वैतरणा - 13 टक्के

  • भातसा -18 टक्के

  • विहार - 35 टक्के

  • तुळसी- 36 टक्के


पाणी कपातीचे (Water Cut)  संकट उभं राहण्याची शक्यता


मुंबईकर सध्या उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे या दिवसांत पाणी कपात होणं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल. त्यामुळे मुंबईकरांनी आता पाणी जपून वापरण्याची गरज आहे. तसेच येत्या काळात मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्यचा प्रश्न देखील गंभीर होतोय की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.  आधीच मुंबईचा उकाडा त्यात कमी पावसाचा अंदाज आणि आता कमी पाणीसाठा त्यांमुळे मुंबईकरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न येत्या  काही काळात निर्माण होणार असल्याची चिन्ह सध्या दिसत आहेत.  तापमान वाढत असताना दुसरीकडे पाण्याचे संकट देखील आ वासून उभे आहे.


हे ही वाचा :


Nashik News : पाण्यापायी महिलांच्या डोळ्यात पाणी..., नाशिक जिल्ह्यात 55 गावांना टँकर, अशी आहे धरणांची स्थिती