Mumbai News : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) (Goregaon Mulund Link Road) प्रकल्पाला गती मिळाली असून, या प्रकल्पातील जुळे भूमिगत बोगदे खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टनेल बोअरिंग मशीन (TBM) चे पहिले सुटे भाग मुंबईत दाखल झाले आहेत. हे मशीन एकत्र करून पुढील वर्षी पावसाळ्यापूर्वी बोगद्याच्या कामास प्रारंभ करण्याचा मुंबई महापालिकेचा (BMC) मानस आहे.
या प्रकल्पाअंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीपासून ते मुलुंडमधील खिंडीपाडा येथे 4.70 किमी लांबीचे दोन भूमिगत बोगदे बांधण्यात येणार आहेत. हे बोगदे एकमेकांशी समांतर असणार असून, संपूर्ण मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराखालून जमिनीखाली जाणार आहे.
दीड तासाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर (Goregaon Mulund Link Road)
सध्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडमार्गे मुलुंड ते गोरेगाव किंवा ठाण्याचा प्रवास करण्यासाठी एक ते दीड तास लागतो. मात्र, हा नवा बोगदा मार्ग खुला झाल्यानंतर हा प्रवास केवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये पार पडणार असून, प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.
प्रगत तंत्रज्ञानाची मदत (Goregaon Mulund Link Road)
या कामासाठी ऑस्ट्रेलियन कंपनीकडून दोन महाकाय टीबीएम मशिन्स मागवण्यात आल्या असून, पहिल्या मशीनचे सुटे भाग दाखल झाले आहेत. दुसऱ्या मशीनचे भाग नोव्हेंबरपर्यंत येण्याची शक्यता असून, सुमारे चार मजली उंचीच्या या मशिन्सचे जोडणी आणि तपासणीसाठी 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यानंतर ऑगस्ट 2026 मध्ये प्रत्यक्ष बोगदा खोदण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. मात्र, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापूर्वीच काम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे.
संरेखन बदलले, खर्च वाढला (Goregaon Mulund Link Road)
मूळ संकल्पनेनुसार बोगद्याचा आरंभ हबाळेपाडा (गोरेगाव) येथून होणार होता. परंतु, त्या ठिकाणी असलेल्या स्थानिकांची घरे आणि व्यवसाय स्थलांतरासाठी तयार नसल्याने संरेखन 600 मीटरने पुढे नेण्यात आले. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च वाढला असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
पेटी बोगद्याचीही उभारणी (Goregaon Mulund Link Road)
चित्रनगरी परिसरातून बोगद्यात शिरण्यासाठी पेटी बोगदाही बांधण्यात येणार आहे. हे संपूर्ण काम प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि पर्यावरणाचे भान ठेवून राबवले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आणखी वाचा