मुंबई : ट्रॅफिक पोलिसांसोबतच्या वादाचे अनेक प्रकार रोज मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळतात. वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते, त्यावेळी अनेकदा हे वाद होतात. अशाच एका घटनेत काल (16 फेब्रुवारी) चार तृतीयपंथीयांनी मिळून ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचं समोर आलं आहे. पंतनगर पोलिसांच्या माहितीनुसार विक्रोळी वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या विनोद सोनवणे यांना ही मारहाण झाली आहे. याप्रकरणी लहू मकासरे, विक्की कांबळे, तनु ठाकूर आणि जेबा शेख यांना अटक करण्यात आली आहे.


विनोद सोनवणे यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मी छेडानगर जंक्शनजवळ ट्रॅफिक कंट्रोल करत होते. त्यावेळी तीनहून अधिक प्रवासी एका ऑटो रिक्षातून प्रवास करताना मला आढळले. त्यांनी वाहतुकीचे नियम न पाळल्याने मी रिक्षा थांबवली आणि वाहतुकीचे नियम पाळले नाही म्हणून दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरु केली.


विनोद सोनवणे यांनी रिक्षाचा फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी रिक्षातील एक तृतीयपंथी खाली उतरून सोनवणे यांच्याशी वाद घालू लागला. वाद इतका वाढला त्यांनी सोनावणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आधी सोनवणे यांच्या डोक्याला मारण्यात आली आणि मग त्यांना लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. या वादात सोनावणे यांचा गणवेशही फाडला आणि त्यांच्या हातातील वॉकीटॉकी हिसकावून खाली जमिनीवर आपटली.


घटनेनंतर विनोद सोनवणे यांनी पंतनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या तृतीयपंथीयांना अटक केली आहे. या सर्वांविरोधात आयपीसीच्या कलम 353, 332, 294, 427, 504 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला. लहू मकासरे, विक्की कांबळे, तनु ठाकूर आणि जेबा शेख अशी अटक करण्यात आलेल्याांची नावे आहेत.