भिवंडी : कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीवर निर्बंध घातले. तसेच महासभा देखील ऑनलाईन घेण्यात येते आहे असे असताना दुसरीकडे कोरोना नियमांचे उल्लंघन करीत हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत भिवंडी महापौर चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट स्पर्धा तत्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांनी केल्याने भिवंडी महापौर चषक क्रिकेट स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
भिवंडी शहर व तालुक्यातील क्रिकेट रसिकांना वेड लावणाऱ्या चॅलेंज ग्राऊंडवरील महापौर चषक या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेस महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या शुभहस्ते नाणेफेक करून रविवारी भव्य शुभारंभ करण्यात आला आहे . ही स्पर्धा तब्बल 32 वर्षांपासून आयोजित केली जात आहे . महापौर प्रतिभा पाटील यांच्या काळात महापौर चषक स्पर्धांचे आयोजन केले आहे. यावेळी महापालिकेच्या वतीने सर्वांना निमंत्रण पत्रिका देखील वाटण्यात आली असून या स्पर्धेचा शुभारंभ भव्य लेझर फायर शो ने करण्यात आला. यंदा या स्पर्धेत संपूर्ण शहर व तालुक्या तून तब्बल 120 संघ सहभागी झाले
महापौर चषक क्रिकेट स्पर्धा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोरोना संकट असतांनाही महापौरांनी कोरोना नियम धाब्यावर बसवून ही स्पर्धा आयोजित केली व महापालिकेच्या वतीने निमंत्रण देखील देण्यात आले . शहरात कोरोना संकट वाढल्यास त्यास जबाबदार कोण राहणार? महापालिका प्रशासन तसेच महापौरांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालून स्पर्धा आयोजित केल्याने ही स्पर्धा त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अरुण राऊत यांनी केली आहे.
तर या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूवृत्ती निर्माण व्हावी व या स्पर्धेतून खेळाडूंनी एकमताने खेळावे व भिवंडीच नाव उज्वल करतील असा आम्हाला विश्वास असून त्यासाठीच स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी दिली आहे.