मुंबई : उत्तुंग परिवारातर्फे वार्षिकोत्सवानिमित्त देण्यात येणारे उत्तुंग सन्मान काल (20 जानेवारी) विलेपार्ले इथल्या लोकमान्य सेवा संघाच्या प्रांगणात देण्यात आले. यावर्षी रानकवी ना धो महानोर, गायक सुरेश वाडकर, सतारवादक शंकरराव अभ्यंकर आणि लेखक शेषराव मोरे यांना विविध पुरस्कार देण्यात आले. सोबत मुक्ता मनोहर आणि पंडित नलिनीताई जोशी यांना देखील विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आलं.

याचवेळी गदिमा, पुल देशपांडे आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ना धो महानोर यांची मुलाखत घेण्यात आली. समीरा गुजर यांनी ही मुलाखत घेतली. अनेक वेगवेगळे आणि कधीही न ऐकलेले किस्से यावेळी ना धो यांनी प्रेक्षकांना ऐकवले. ही तिन्ही माणसे त्यांना कशी जवळ येत गेली आणि त्यांचे काम किती मोठे आहे हे महानोर यांनी सांगितले.

या कार्यक्रमानंतर प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर आणि वेदश्री ओक यांनी गदिमा, पुल देशपांडे, सुधीर फडके यांनी गायलेली, सांगितबद्ध केलेली सुरेल गाणी गायली. रसिकांनी देखील त्याला भरभरुन प्रतिसाद दिला.

पुरस्कारविजेते मानकरी

उत्तुंग जीवन साफल्य पुरस्कार - रानकवी ना धो महानोर
सन्मानचिन्ह, मानपत्र आणि  75 हजार रुपये

उत्तुंग जीवन गुणगौरव पुरस्कार - सीतारवादक आणि बंदीशकार शंकरराव अभ्यंकर
सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 हजार रुपये

उत्तुंग राष्ट्रविचार सन्मान - लेखक शेषराव मोरे
सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 हजार रुपये

उत्तुंग कला योगदान पुरस्कार - गायक सुरेश वाडकर
सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 हजार रुपये

उत्तुंग सेवाव्रती भाऊबीज पुरस्कार - मुक्ता मनोहर
सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 हजार रुपये

उत्तुंग भक्तियोगदान पुरस्कार - पंडित नलिनीताई जोशी
सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 हजार रुपये