मुरबाड : तालुक्यातील तुळई गावात एका दोन वर्षाच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गावातीलच एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने चिमुरडीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मनिष्का जाधव असे खून झालेल्या २ वर्षीय चिमुरडीचे नाव आहे. याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून हत्येप्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला ताब्यात घेतले आहे.
मनिष्का आणि हत्या करणारी मुलगी, या दोघींची घरं शेजारीच आहेत. शुल्लक कारणावारुन मनिष्काची आई व आरोपी मुलीमध्ये भांडण झाले होते. तेव्हा मनिष्काच्या आईने आरोपी मुलीला शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून या मुलीने अवघ्या दोन वर्षांच्या मनिष्काला खेळवण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरात नेले. तिथे तिने मनिष्काचा गळा दाबून हत्या केली व मृतदेह घराच्या माळ्यावर लपवला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड तालुक्यातील तुळई या गावातील मृत मनिष्का जाधव ही 2 वर्षीय चिमुरडी शनिवारी दुपारपासून तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. बराच वेळ ती दिसून न आल्याने तिच्या नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरु केली. तरिही मनिष्का सापडली नाही. यामुळे मनिष्काच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल केली.
तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मनिष्काचा तपास सुरु केला. अखेर पोलिसांना मनिष्काचा मृतदेह आरोपी मुलीच्या घराच्या माळ्यावर सापडला. मनिष्काची आई शिवीगाळ करते म्हणून आरोपी मुलीने मनिष्काची गळा दाबून हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी आरोपी मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बाळाच्या आईने शिवी दिली म्हणून 'तिने' बाळाचीच हत्या केली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jan 2019 10:42 PM (IST)
मुरबाडमध्ये एका दोन वर्षाच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गावातीलच एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने चिमुरडीची हत्या केल्याची उघड झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -