मुंबई : कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असली तरी संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन पूर्वतयारीचा भाग म्हणून मुंबई महापालिका कोविडच्या काळात सुरु करण्यात आलेली सर्व रुग्णालये तशीच सुरु ठेवणार आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने बरे होऊन घरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात बेड रिकामे झाले आहेत. कोविडच्या सुरुवातीच्या काळात रुग्णालये वगळता स्वतंत्र तात्पुरत्या हॉस्पिटलची (जम्बो फॅसिलिटी) उभारणी मुंबईमध्ये करण्यात आली होती.


संपूर्ण राज्यात मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे साहजिकच कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात रुग्णांसाठी बेड्सची टंचाई निर्माण झाली होती. ती कमतरता दूर करण्यासाठी महापालिकेने काही रुग्णालये फक्त कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवली होती. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात आली होती. तसेच वांद्रे-कुर्ला संकुल, वरळी येथील डोम, गोरेगाव येथील नेसको सेंटर, भायखाळा येथील रिचर्डसन क्रुडास, मुलुंड आणि दहिसर या ठिकाणी कोरोनाबाधितांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची रुग्णालये उभारण्यात आली होती. या रुग्णालयात बहुतांश सर्वच बेड्सना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे.


मुंबईतील सात विभागांचा पाणी पुरवठा उद्या बंद!


याप्रकरणी, मुबंई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी एबीपी माझा डिजीटलशी बोलताना सांगतिले कि, "कोरोना काळात रुग्णांसाठी सुरु करण्यात आलेली सर्व रुग्णलाय आहे तशीच चालू राहणार आहे. उलट पूर्व तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. काही कंत्राटी पद्धतीवर आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यात डॉक्टरही आहेत. त्यापैकी काहींचे कंत्राट वाढीविण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर जेथे अगदीच गरज नाही तेथे काम थांबविण्यात आले आहे. परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येत आहे. त्याशिवाय काही डॉक्टरांना काही दिवसांकरिता आराम किंवा सुट्टी देण्याचे सर्व अधिकार हे तेथील अधिष्टातांना देण्यात आले आहे. त्यांनी हा सुद्धा निर्णय परिस्थिती पाहून घ्यायचा आहे."


आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही कोरोनासाठी ज्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत तसेच जी सुविधा निर्माण करण्यात आली आहे ती कायम ठेऊन त्यात अजून वाढविण्यासाठी प्रयत्न करतानाच खासगी रुग्णालयांच्या 80 टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णयही कायम राहील. त्याचप्रमाणे टास्क फोर्सने जे आदर्श उपचार कार्यपद्धती तयारी करून दिली आहे, त्यानुसार उपचार करण्याचे आवाहन केले आहे.


BMC Commissioner | मुंबईत लक्ष्मीपूजन वगळता इतर दिवशी फटाक्यांना बंदी, BMC आयुक्तांची माहिती