मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. दरदिवशी कोरोना रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळत आहे. मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने 'मिशन टेस्टिंग' सुरु केलं आहे. यासाठी पालिकेकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.



काय आहेत गाईडलाईन्स?



  • मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा याठिकाणी दररोज सुमारे 50 हजार टेस्ट करण्याचं लक्ष्य.

  • टेस्टला नकार देणाऱ्यांवर कारवाई होणार.

  • मुंबईतील 27 प्रमुख मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची अॅन्टिजेन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश. 

  • प्रत्येक मॉलमध्ये दिवसाला किमान 400 टेस्ट होणार.

  • पॅलेडियम, फिनीक्स, रुणवाल, इन्फिनीटी, इनॉर्बिट यांसारख्या मोठ्या मॉलमध्ये दररोज हजारोंच्या संख्येनं लोक येतात. आठवड्या शेवटी मुंबईतील सर्व मॉलमध्ये लाखो लोकांची गर्दी होते. मोठ्या मॉलमध्ये प्रवेशासाठी अॅन्टिजेन चाचणी बंधनकारक केल्यास आपोआप गर्दीला आळा बसेल.

  • मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. 22 मार्चपासून सर्व मॉल्ससाठी स्वॅब संकलन केंद्र सक्तीचे करण्यात आलं आहे. यासाठी मॉलच्या प्रवेशद्वारावरच पथक नियुक्त केलं जाणार.

  • प्रत्येक वॉर्डमधील गर्दीच्या ठिकाणी दररोज 1000 टेस्टचे टार्गेट

  • गर्दीची ठिकाणे- रेस्टॉरंटस्, खाऊ गल्ली, फेरीवाले, बाजारपेठा, पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे-चौपाट्या, वेगवेगळी सरकारी कार्यालये.

  • मुंबईतील लांब पल्ल्याच्या, बाहेरगावच्या रेल्वे येणारे 9 मुख्य रेल्वे स्थानक - वांद्रे, दादर, बॉम्बे सेंट्रल, सीएसटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली इत्यादी या स्थानकांवर दर दिवसाला प्रत्येकी  किमान 1000 प्रवाशांच्या चाचण्या होणार.

  • विशेषत: विदर्भातून, गोवा, गुजरात, केरळ, दिल्ली येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाचं विशेष लक्ष असेल.

  • मुंबईतील मुख्य बस स्थानक-  परळ, मुंबई सेंट्रल, बोरिवली, कुर्ला-नेहरु नगर येथे दररोज 1000 प्रवाशांच्या चाचण्या होणार.


लक्षणं नसलेल्या रुग्णांना शोधणं खूप अवघड काम आहे. अशी व्यक्ती जर मॉल वा इतर गर्दीच्या ठिकाणी गेली, तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे आता मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लोकांनी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा किंवा स्वॅब देणे सक्तीचं असणार आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष आहे. सध्या 20 ते 23 हजार टेस्ट दिवसाला होतायेत.