मुंबई : पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली 'नाईट लाईफ' येत्या 26 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनिवासी भागात सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने यासंदर्भात नियमावली जारी केली आहे. यामध्ये पोलीस, मुंबई महापालिका, उत्पादन शुल्क विभाग, कामगार विभाग, पर्यटन विभाग यांची काय काय जबाबदारी असणार आहे. नाईट लाईफमध्ये सहभागी मॉल, रेस्टॉरंट यांनी कुठले नियम पाळणे गरजेचे आहे, याची विस्तृत नियमावली पालिकेने बनवली आहे.


नाईट लाईफचे नियम काय असणार?


रात्री दीड वाजेनंतर दारु बंद असणार आहे. रात्री दीड वाजेपर्यंतच मद्यविक्रीस परवानगी असणार आहे. रात्री दीड वाजेनंतर दारु विकताना आढळल्यास संबंधितांचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द केला जाईल. तसेच तेथील मॉल किंवा मिलला नाईट लाईफ सुरू ठेवण्यास परवानगी नाकारली जाईल. कामगार कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी केली जाईल.


जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, बीकेसी, वरळी सी फेस, वांद्रे बँडस्टँड, नरिमन पॉईंट रोड आणि एनसीपीए कॉर्नर या ठिकाणी फूड ट्रक म्हणजे वाहनावरील उपहारगृह लावण्यास परवानगी दिली जाईल. परंतु एका ठिकाणी पाच फूड ट्रक उभे राहतील, जे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील.


मुंबईत नाईट लाईफ मागचं सरकार काही कारणांमुळे लागू करू शकलं नाही. मुंबईचा उत्पन्न आणि रोज निर्मितीसाठी हे गरजेचं आहे. यामुळे टॅक्सी, रेल्वे यांना सुद्धा चालना मिळेल. खासगी सिक्युरिटी असेल तसेच ज्यांना पोलीस सिक्युरिटी हवी असेल त्यांना ती दिली जाईल, त्यामुळे सरकारला सिक्युरिटीचं उत्पन्न मिळेल. पोलिसांवर यामुळे ताण वाढणार नाही, पोलिसांचा ताण उलट कमी होईल, असं आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.


मुंबईक नाईट लाईफ ही योजना होती ती जीआर प्रमाणे सुरू ठेवायला हवी होती. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 24 तास डिलिव्हरी सुरू असतात. मुंबई 24 तास धावते शहर आहे, नाईट शिफ्ट करणारे लोक याठिकाणी आहेत.  लोकांना 10 वाजेनंतर भूक लागली तर जायचं कुठे? शॉपिंग, पिक्चर काहीच करू शकत नाही, त्यामुळे नाईट लाईफ गरजेची असल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं.