Dasara Melava 2023: मुंबई : यंदाही शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसऱ्याच्या (Dasara Melava) मुहूर्तावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) जी उत्तर विभागानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न निकाला निघाला आहे. 24 ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. 


शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा हा वाद अखेर मिटला आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवागनी मिळाली आहे. मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला ही परवागनी दिली. त्यानुसार ठाकरे गटाचा दसरा मेळावा 24 ऑक्टोबरला शिवतीर्थवर होणार आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी दुसरीकडे घेण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला होता. अखेर आज महापालिकेने शिवसेना ठाकरे गटाला परवानगी दिली.


ठाकरे गटाच्या नेत्यांची प्रतिक्रिया


दरम्यान, ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी आपली प्रतिक्रिया एबीपी माझाकडे दिली. "हा नैतिकतेचा विजय आहे. महापालिकेने यापूर्वीच विचार करुन याआधीच परवानगी द्यायला हवी होती. पण उशिरा का असेना पण मनपाने शहाणपण दाखवलं. परवानगीमध्ये जो तांत्रिक भाग होता, त्यानुसार अर्जदाराचा पत्ता सेनाभवनाचा होता. सेनाभवनातूनच आपण पत्रव्यवहार करतो. तो आम्ही यापूर्वीच केला होता. गेल्या वर्षीही कोर्टाने आम्हाला परवानगी दिली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शिस्तप्रिय शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा होईल", असं सचिन अहिर म्हणाले.


शिंदेंचं एक पाऊल मागे, ठाकरेंचा मार्ग मोकळा? 


मंत्री दीपक केसरकरांनी शिंदे गट शिवाजी पार्क नाहीतर क्रॉस मैदान किंवा ओव्हल ग्राउंडवर दसरा मेळावा घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकेत शिवाजी पार्कसाठी केलेला अर्जही शिंदे गटानं मागे घेतला होता. शिंदे गटानं एक पाऊल मागे घेतल्यानंतर ठाकरेंचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र मुंबई महानगरपालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर आज महापालिकेनं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा निर्णय निकाली काढला. महापालिकेकडून ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 


शिंदेंचा दसरा मेळावा कुठे?


मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार आहे. तसेच, आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही. विकासाचं राजकारण करतो. त्यामुळेच वादात न जाता शिवाजी पार्कऐवजी दुसरं मैदान आम्ही घेतलेलं आहे. ठाकरे गट स्वत:च राजकारण करतो आणि स्वत:च प्रसिद्धी मिळवतो, हे आता जनतेनं ओळखावं, असा टोलाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


दरम्यान, शिंदेंनी दसरा मेळाव्यासाठी नवे पर्याय शोधले असून शिवाजी पार्कवरचा दावा सोडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या शिंदे गटानं घेतलेल्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कोणाला मिळणार? हा वाद संपुष्टात आला आहे. 


पाहा व्हिडीओ : Uddhav Thackeray Dasara Meleava Shivajipark : ठाकरे गटाचा मेळवा शिवाजीपार्कवरच, BMC कडून हिरवा कंदील