मुंबईत अनधिकृत बांधकाम, महापालिका म्हणते, आम्हाला माहित नाही!
एबीपी माझा वेब टीम | 22 Oct 2018 10:22 AM (IST)
सदर अनधिकृत बांधकामाबाबत माहिती अधिकाराखाली महापालिकेकडे विचारणा केली असता पालिका प्रशासनाने याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली.
मुंबई : मुंबईतील अनधिकृत बांधकामांप्रकरणी मुंबई महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. मुंबई महापालिकाला आपल्या क्षेत्रांतील अनधिकृत बांधकामांचीच माहिती नसल्याचं समोर एका आरटीआयच्या माध्यामातून समोर आलं आहे. शिवसेना नगरसेविका अरुंधती दुधडवकर नगरसेविका राहत असलेल्या ठिकाणी हे अनधिकृत बांधकाम असल्याचे उघडकीस आले आहे. या अनधिकृत बांधकामाविषयी माहिती आरटीआयच्या माध्यामातून संजय दुबे यांनी मागवली होती. मात्र याची कोणतीही माहितीच पालिकेला नसल्याचे समोर आलं आहे. माजी नगरसेवक अरविंद दुधवडकर आणि आजी नगरसेविका अरूंधती दुधवडकर यांचे ताडदेव येथील दिपक अपार्टमेंट, सुपारीवाला इमारतीत घर आहे. ताडदेव टॉवरजवळील वॅलेंटाईन स्पोर्टस् क्लबला लागून एक वाढीव बांधकाम करण्यात आले आहे. हे वाढीव अनधिकृत बांधकाम कोणतीही परवानगी न घेता करण्यात आले आहे. दुधवडकर यांनीच क्लबच्या मोकळ्या मैदानावरील संरक्षक भिंतीवर अतिक्रमण करत बांधकाम केले असल्याचा आरोप केला जातोय. सदर बांधकामाबाबत माहिती अधिकाराखाली महापालिकेकडे विचारणा केली असता पालिका प्रशासनाने याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली. दुधवडकर यांनी यावर स्पष्टीकरण देत सदर वाढीव बांधकाम आपण केले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर या ठिकाणी सुरक्षारक्षक राहत असल्याचेही त्यांनी म्हटलं.