मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मुंबईतील वाढीव वॉर्डचा आरखडा तयार करण्यात आला आहे. वाढीव नऊ वॉर्डच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी होण्याची प्रतीक्षा आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
राज्यपालांच्या सहीला वेळ लागला तरी आगामी अधिवेशनात कायदा मंजूर करुन मुंबईतल्या वॉर्डची संख्या 227 वरुन 236 वर नेता येणार आहे. मुदतीत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरता प्रशासन सक्षम आहे.
मुंबईतले नवे नऊ वॉर्ड कोणते?
- पश्चिम उपनगरे येथे 4 ते 5 वॉर्ड वाढणार
- पूर्व उपनगरांत 3 ते 4 वॉर्ड वाढणार
- मुंबई शहरात 1 वॉर्ड वाढणार
ज्या ठिकाणी नव्या इमारती, वस्त्या,तसेच लोकसंख्येची घनता वाढली आहे. त्या ठिकाणी नवे वॉर्ड तयार होणार आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्माण झालेला प्रश्न मुंबई महापालिका निवडणूकीत मात्र अडथळा ठरु शकत नाही. कारण, मुंबईत ओबीसींकरता राखीव सीटची संख्या मर्यादित आहे.
दरम्यान आगामी 15 महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. या होऊ घातलेल्या निवडणुका केवळ आणि केवळ राजकीय फायद्यासाठी आता पुढे ढकण्याची शक्यता आहे आणि अशी कुजबुज आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे प्रशासन या सगळ्या निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज आहे. पण केवळ राजकारणांकडून आपल्या राजकीय फायद्यासाठी 15 पालिकांची निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 2001 ते 2011 या दशकात लोकसंख्येत 3.87 टक्के वाढ झालीय. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ आणि वाढते नागरीकरण या गोष्टींचा विचार करून प्रतिनिधीत्व निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या 236 अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे