Mumbai Local Train Updates :  रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य सरकारने युटीएस मोबाईल अ‍ॅप आणि युनिव्हर्सल पास लिंक केले आहेत. त्यानंतर आता मुंबई लोकल मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागणार नाही. अशातच कोरोनाच्या प्रादुर्भावापासूनच मुंबई लोकलचं युटीएस अॅप बंद होतं. आता मात्र ते अॅप पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना अॅपमार्फत तिकीट आणि पास काढणं शक्य होणार आहे. 


महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मुंबई उपनगरीय लोकलचे युटीएस ॲप बंद करण्यात आले होते. आता मात्र हे ॲप पुन्हा सुरु करण्यात आले असून, प्रवासी या ॲपद्वारे सिंगल आणि रिटर्न तिकीट तसेच पास काढू शकणार आहेत. राज्य सरकारने ज्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत आणि 14 दिवस उलटून गेले आहेत, अशा प्रवाशांना लोकलने युनिव्हर्सल पास काढून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. तसेच आता पास सोबत तिकीट देखील आता मिळू लागले आहे. परिणामी स्थानकावरील तिकीट खिडक्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी यूटीएस ॲप सुरु करण्याची मागणी अनेक प्रवाशी संघटनांकडून करण्यात आली होती. मात्र युटीएस अॅप हे युनिव्हर्सल पास पोर्टलला लिंक नसल्यानं तिकीट देता येत नव्हते. अखेर राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनानं युटीएस ॲप हे युनिव्हर्सल पासच्या कोविन पोर्टलला लिंक केले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे युनिव्हर्सल पास आहे, असे प्रवासी या यूटीएस ॲपचा वापर करून तिकीट किंवा पास काढू शकतात आणि लोकलनं वेळ वाया न घालवता प्रवास करू शकतात. 


कोणाला मिळणार तिकीट? 


लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना लोकलचं तिकीट मिळणार आहे. राज्य सरकारने लोकलची तिकीट्स विक्री बंद करून सर्वांना फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. मात्र, त्यामुळे काही दिवस प्रचंड गोंधळ आणि संतापाचे वातावरण होते. रेल्वे ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर सरकारने रेल्वेला पत्र लिहून लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अश्या सर्वच प्रवाश्यांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावे अशी विनंती केली होती. त्यासाठी रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी अशा सूचना देखील राज्य सरकारच्या पत्रात होती. 


दरम्यान, प्रवाशांच्या लसीकरण स्थितीची पडताळणी करणारी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे महामारीच्या काळात युटीएस मोबाइल अ‍ॅप निलंबित करण्यात आले होते. आता युटीएस ॲप लोकांसाठी उघडले जाईल. योग्य लसीकरण पडताळणी द्वारे राज्य सरकारचे पोर्टल आणि रेल्वे युटीएस मोबाइल अ‍ॅप लिंक करणं शक्य झालं आहे. हे नवीन ॲप्लिकेशन एक स्वतंत्र उदाहरण आहे. जिथे रेल्वे सर्व्हर तिकिटांच्या प्रमाणीकरणासाठी बाह्य सर्व्हरशी हातमिळवणी करत आहेत.  युनिव्हर्सल पास पोर्टल आणि यूटीएस मोबाईल ॲपला जोडणे हा महाराष्ट्र राज्य सरकार, रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (CRIS) आणि मध्य रेल्वेचा संयुक्त प्रयत्न आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mumbai Local Trains : लोकल प्रवाशांसाठी खुशखबर; लसीचे दोन डोस घेतलेल्यांना तिकीट मिळवणं आणखी सोपं